शबनम न्यूज | प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांना शनिवारी जंतरमंतर येथे आंदोलन करण्यास परवानगी दिल्यानंतर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अमेरिकेहून परतल्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळाच्या टर्मिनल-३ येथे काही पोलीस अधिकाऱ्यांनी दीपके यांची भेट घेतली.
आंदोलनासाठी सुरुवातीला पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशन येथे जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांकडून जंतरमंतर येथे आंदोलनास परवानगी मिळाल्यानंतर CJP ने सर्व आंदोलकांना थेट जंतरमंतर येथे पोहोचण्याचे आवाहन केले.
जंतरमंतरवर मोठ्या संख्येने समर्थक जमले असून आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ‘जय भीम’, ‘आवाज दो, हम एक हैं’ तसेच ‘धर्मेंद्र प्रधान, इस्तीफा दो’ अशा घोषणा देत आंदोलनाला संबोधित केले.
CJP कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन छेडले असून जंतरमंतर परिसरात आंदोलन शांततेत सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


