पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
ताथवडे गावठाण परिसरात मांजरांच्या कारणावरून झालेला शेजारी वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता चिंतामणी सोनवणे (वय ६०, रा. पंचशील नगर, ताथवडे) यांच्या घराजवळ आरोपींची मांजरे येत असल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपी सिमा सूर्यवंशी हिने फिर्यादीला शिवीगाळ करत केस ओढले, तर मानसी सूर्यवंशी हिने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान, सारंग सूर्यवंशी याने रस्त्यावरील वीट उचलून फिर्यादीच्या कपाळावर मारल्याने त्या जखमी झाल्या. ही घटना २६ मे रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.


