spot_img
spot_img
spot_img

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने शासनमान्य पदांवर कार्यरत असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास मे आणि जून महिन्यांचे वेतन दिले जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा विद्यापीठ प्रशासनाने दिला आहे.

विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रकाद्वारे याबाबतच्या सूचना जारी केल्या आहेत. राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाच्या एचटीई सेवार्थ संगणक प्रणालीमार्फत दिले जाते. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती या प्रणालीमध्ये नोंदविण्यात आली आहे.

या माहितीत कर्मचाऱ्यांचे बँक खाते, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक यांचा समावेश आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यांची दुबार नोंद होऊ नये किंवा दुबार वेतन दिले जाऊ नये, यासाठी शासनाने ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या ऑनलाईन HRMS प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांची ई-केवायसी प्रमाणपत्रे तयार करून अपलोड करण्यात आली आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रमाणपत्रातील माहिती तपासून बँकेकडून आधार आणि पॅन क्रमांक खात्याशी संलग्न असल्याचे प्रमाणित करून घ्यायचे आहे.

तसेच, बँक खाते, आधार कार्ड आणि पॅन कार्डवरील नाव एकसारखे असल्याची खातरजमा करणे आवश्यक असून, बँकेने प्रमाणित केलेले मूळ प्रमाणपत्र प्रशासन शिक्षक व शिक्षकेतर विभागाकडे तातडीने जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!