शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिखलीतील मोरेवस्ती परिसरात किरकोळ कौटुंबिक वादातून दोन सख्ख्या भावांनी आपल्या भावालाच बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नाला जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याने परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद वाघमारे हे कामावरून घरी आल्यानंतर मावशीच्या मुलाच्या लग्नाला जाण्याच्या कारणावरून त्यांचे भाऊ निकेश वाघमारे आणि महेश वाघमारे यांच्याशी वाद झाला. वाद वाढल्यानंतर दोघांनी मिळून प्रमोद यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत प्रमोद वाघमारे यांच्या समोरील खालच्या दाताच्या हिरडीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना दोन टाके पडले आहेत. घटनेनंतर जखमी प्रमोद यांनी चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी भावांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.


