शबनम न्यूज | प्रतिनिधी
वासोली परिसरात कौटुंबिक वादातून सासऱ्यासह दोन महिलांवर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला घरी घेऊन जाण्यावरून झालेल्या वादात आरोपींनी थेट कुकरने डोक्यात वार करत मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तात्याराव तायडे यांची मुलगी प्रिती सावळे ही तिचे आधारकार्ड व इतर कागदपत्रे घेण्यासाठी पतीच्या घरी गेली होती. त्यावेळी पती रवि सावळे याने “तू कुठेही जायचे नाही आणि काहीही न्यायचे नाही,” असे म्हणत तिला रोखले.
यानंतर प्रिती हिने वडिलांना फोन करून बोलावून घेतले. तात्याराव तायडे घटनास्थळी पोहोचल्यानंतर आरोपी रवि सावळे व त्याचा भाऊ अतुल सावळे यांनी वाद घालत फिर्यादी, प्रिती सावळे आणि चैत्राली तायडे यांना मारहाण सुरू केली. दरम्यान, आरोपी रवि सावळे याने घरातील कुकर उचलून तात्याराव तायडे यांच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले. तसेच महिलांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.


