शबनम न्यूज | प्रतिनिधी
वसई : वसई-विरार शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, युवासेनेचे पालघर जिल्हाप्रमुख सिद्धेश रवींद्र जोगळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात मंगळवारी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
विशेष म्हणजे, ठाकरे गटाशी तब्बल ४४ वर्षे एकनिष्ठ राहिलेले ज्येष्ठ शाखाप्रमुख प्रभाकर गोपाळ पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. प्रभाकर पाटील हे १९८२ पासून गावराईपाडा येथील शिवसेना शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते. सलग चार दशकांहून अधिक काळ पक्षासाठी काम करणाऱ्या नेत्याने भाजपचा झेंडा हाती घेतल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या वसई-विरार महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट सत्ता मिळाली नसली तरी पक्षाने ४४ जागांवर विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली होती. त्यानंतर भाजपने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी विविध पक्षांतील नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पक्षात सामावून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ मधील उमेदवार सोनल रवींद्र जोगळे, पेल्हार विभागप्रमुख दिलीप कुवेसकर, वसई जमादार आळीचे विभागप्रमुख मनीष गायकवाड, उपविभागप्रमुख जितेश पवार, युवासेना शाखा अधिकारी आसिफ पठाण तसेच शैलेंद्र गोलवणकर यांचा समावेश आहे. याशिवाय शेकडो कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे वसई-विरार परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी स्थानिक राजकारणात भाजपची ताकद आणखी वाढण्याची चर्चा सुरू झाली आहे.


