प्रतिनिधी – युनूस खतीब | पिंपरी-चिंचवड
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक शाखेकडून विशेष वाहतूक बदल अधिसूचना जारी करण्यात आली आहे. निगडीतील चाफेकर चौक येथील ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहणार असल्याने तसेच भोसरी एमआयडीसी परिसरातील तात्पुरत्या कत्तलखान्यामुळे वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन काही प्रमुख रस्त्यांवर वाहतूक बंदी व पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी मोटार वाहन कायद्यांतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हे तात्पुरते आदेश जारी केले आहेत. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
निगडी वाहतूक विभागात वाहतूक बदल
चाफेकर चौक परिसरातील ईदगाह मैदान येथे होणाऱ्या नमाज पठणादरम्यान दि. २७ मे २०२६ रोजी सकाळी ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतूक बदल लागू राहणार आहे.
बंद करण्यात आलेले मार्ग :
मरीआई माता मंदिर ते चाफेकर चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार.
चाफेकर चौक ते मरीआई माता मंदिर मार्गावर प्रवेशबंदी.
मोरया नगर ते चाफेकर चौक मार्गावरील वाहतूक बंद.
पर्यायी मार्ग :
एसकेएफ कंपनीमार्गे अहिंसा चौकातून वाहतूक वळविण्यात येणार.
सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल मागील रस्त्याचा वापर करण्याचे निर्देश.
जुना जकात नाका मार्गे पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.
भोसरीतील तात्पुरत्या कत्तलखान्यामुळे वाहतूक निर्बंध
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पाळीव प्राणी चिरंतन भूमी पाठीमागे, हॉकी स्टेडियम चौक, एमआयडीसी भोसरी येथे तात्पुरता कत्तलखाना उभारण्यात आला आहे. या ठिकाणी जनावरांची खरेदी-विक्री, वाहतूक आणि मांस वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होणार असल्याने परिसरात विशेष वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
हे निर्बंध दि. २८ मे २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते दि. २९ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
प्रवेशबंदी असलेला मार्ग :
हॉकी स्टेडियम चौक ते गुलाब पुष्प उद्यान चौक दरम्यान सर्वसामान्य वाहनांना प्रवेशबंदी.
पर्यायी मार्ग :
नेहरूनगरकडून येणारी वाहने ‘क’ प्रभाग कार्यालय मार्गे बीएचटीसी कंपनीसमोरून वळविण्यात येतील.
गुलाब पुष्प उद्यान चौकातून हॉकी स्टेडियमकडे येणारी वाहने पर्यायी अंतर्गत मार्गाने सोडण्यात येणार.
शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच कत्तलखान्याकडे जाणाऱ्या वाहनांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे.
वाहतूक शाखेकडून नागरिकांना संयम राखून पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


