शबनम न्यूज | प्रतिनिधी
गेल्या ४० वर्षांपासून रुग्णसेवेत अग्रेसर असलेल्या चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलमधील जवळपास ४०० परमनंट (कायमस्वरूपी) कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या १० ते ११ महिन्यांचा थकीत पगार आणि कोरोना काळातील हक्काचे मानधन न मिळाल्यामुळे या संतप्त कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. या आंदोलन स्थळी उपस्थित राहून राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारावर कडाडून टीका केली. यावेळी सर्व कामगारांनी काळया फिती बांधून हॉस्पिटलचा त्रीव निषेध व्यक्त केला.

यावेळी मीडिया प्रतिनिधीशी बोलताना कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की,व्ही. जी. वैद्य (चेअरमन) आणि एन. व्ही. वैद्य (प्रमुख डायरेक्टर) यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे हे ट्रस्टचे हॉस्पिटल अचानक दुसऱ्या व्यवस्थापनाकडे हस्तांतरित (हँडओव्हर) करण्यात आले आहे. हे हॉस्पिटल आता प्रसिद्ध ‘सह्याद्री ग्रुप’ने विकत घेतल्याचे समजते.हॉस्पिटलचे हस्तांतरण होताच, नव्या व्यवस्थापनाने “आम्हाला परमनंट कर्मचारी नको असून सर्व जागा कंत्राटी (कॉन्ट्रॅक्ट) पद्धतीने भरायच्या आहेत,” अशी भूमिका घेतली. यामुळे वर्षानुवर्षे आणि विशेषतः कोविडच्या अत्यंत कठीण काळात स्वतःच्या प्राणाची बाजी लावून काम करणाऱ्या ४०० कामगारांना एका रात्रीत कामावरून काढून देशोधडीला लावण्यात आले आहे.
कामगारांच्या या न्याय्य हक्कांसाठी कामगार आयुक्त, तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीत अनेक बैठका आणि मध्यस्थीचे प्रयत्न झाले. अगदी पोलिसांनीही मध्यस्थी करत “कामगारांचा किमान १० महिन्यांचा हक्काचा पगार तरी द्या,” अशी समज व्यवस्थापनाला दिली होती. मात्र, मुजोर व्यवस्थापनाने या सर्व प्रयत्नांना केराची टोपली दाखवली आहे. सध्या मूळ व्यवस्थापनातील प्रमुख अधिकारी पळून गेले असून कामगारांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.कामगारांनी एकच चूक केली की त्यांनी जुनी युनियन सोडून बाहेरच्या युनियनचा हात धरला आणि तिथेच या ४०० कामगारांचा घात झाला. आज इंडस्ट्रियल कोर्टात अडीच वर्षांपासून या कामगारांना फक्त तारखांवर तारखा देऊन मॅनेज केले जात आहे. महाराष्ट्रात जर असेच चित्र राहिले, तर कामगारांचा असंतोष तीव्र होईल.
सध्या व्यवस्थापनाचे प्रतिनिधी सुनील काळे (ज्यांना स्वतःलाही १० महिने पगार मिळालेला नाही) यांनी पोलिसांसोबत झालेल्या चर्चेत सोमवारपर्यंत पगार कधी देणार याबाबीचा निर्णय कळवण्याचे आश्वासन दिले आहे.आंदोलकांनी स्पष्ट केले आहे की, सह्याद्री ग्रुपचे चेअरमन चारू आपटे हे एक सभ्य आणि नावाजलेले गृहस्थ आहेत. त्यामुळे ते या कामगारांच्या प्रश्नावर सहानुभूतीने विचार करतील आणि कर्मचाऱ्यांचा १० महिन्यांचा पगार देऊन त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेतील, अशी आशा कामगारांना आहे. मात्र, सोमवारी (दि.२५) जर पगार मिळाला नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी दिला आहे.


