शबनम न्यूज | प्रतिनिधी
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात घरयादी व घरगणनेच्या प्रक्रियेला १६ मे २०२६ पासून अधिकृत सुरुवात होणार आहे. ही मोहीम १४ जून २०२६ पर्यंत राबविण्यात येणार असून, या कालावधीत नियुक्त प्रगणक घरोघरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करणार आहेत.
प्रगणक आपल्या घरी भेट देत असताना नागरिकांनी त्यांना अचूक, संपूर्ण व योग्य माहिती देऊन सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. तसेच, ज्यांनी स्व-नोंदणी केली आहे त्यांनी आपला स्व-गणना क्रमांक प्रगणकांना देणे आवश्यक आहे.
घरयादी व घरगणना ही जनगणनेची मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाची पायरी असून, या प्रक्रियेत घरांची संख्या, कुटुंबातील सदस्यांची माहिती तसेच उपलब्ध मूलभूत सुविधांची नोंद केली जाते. या माहितीच्या आधारे शासन विविध विकास आराखडे, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करते.
त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीची जाणीव ठेवून या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे, असे उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी यावेळी सांगितले.
जनगणना ही देशाच्या विकासाची दिशा ठरवणारी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. अचूक माहितीच्या आधारेच शासनाला योग्य नियोजन करता येते आणि नागरिकांपर्यंत विकासाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवता येतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने ही आपली जबाबदारी समजून प्रामाणिक व अचूक माहिती देऊन या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा.
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
जनगणेसाठी संकलित केली जाणारी सर्व माहिती ही पूर्णपणे गोपनीय राखली जाते आणि ती केवळ शासकीय नियोजनासाठीच वापरली जाते. नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता विश्वासाने आणि निःसंकोचपणे योग्य माहिती द्यावी. तुमचे सहकार्य हेच शहराच्या आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरेल.
— सचिन पवार, उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


