शबनम न्यूज | प्रतिनिधी
आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेतील २०२२ मधील सरळसेवा भरती प्रक्रियेत कथित बोगस भरती आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
पक्षाच्या प्रतिनिधींनी यासंदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. ‘आप’चे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेतील काही विभागांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, राजेंद्र बबनराव खेडेकर, नमिता बनसोडे आणि शिवानंद बाळासाहेब पाटील यांच्या टोळीने संगनमताने उमेदवारांकडून प्रत्येकी तब्बल 45 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. संबंधित उमेदवारांना बनावट नियुक्ती आदेश तसेच प्रशिक्षण आदेश देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
या कथित गैरव्यवहारात प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे आणि सह्यांचा गैरवापर करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकारामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक झाली असून प्रशासनावरील जनतेचा विश्वास डळमळीत होत असल्याची प्रतिक्रिया ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच महापालिकेतील कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.
यासंदर्भात लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही रविराज काळे यांनी सांगितले.


