पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील नव्या पुलावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्रास देत सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणाऱ्या एका महिलेविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. Alandi Police Station येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील नव्या पुलाजवळील लाईटच्या दुसऱ्या पोल परिसरात ही कारवाई करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला संबंधित महिला सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता संबंधित महिला वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करत तसेच शब्द उच्चारून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे सार्वजनिक शिष्टाचार आणि सभ्यतेचा भंग होत असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.
याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश सिताराम कारोटे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित महिला आरोपीस बीएनएस कलम ३५(३) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास पोउपनि पवार करीत आहेत.


