spot_img
spot_img
spot_img

एआय व शाश्वत विकास विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध आणि आय.क्यू.ए.सी. (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने, इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र विभागांतर्गत एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘शाश्वत विकासातील एआय-चलित आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाचे भविष्य: समस्या आणि आव्हाने’ हा या परिषदेचा मुख्य विषय होता. ही परिषद सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी महाविद्यालयात संपन्न झाली.
परिषदेचे उद्घाटन आणि बीजभाषण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य मा. प्रा. डॉ. धोंडिराम पवार, मुंबई विद्यापीठाचे मा. डॉ. प्रकाश मसराम आणि विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, मा. डॉ. स्मिता कुलकर्णी हे या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य मा. प्रो. डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी भूषविले
कार्यक्रमाचे बिजभाषक मा. डॉ. पंडित विद्यसागर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ते (AI) मुळे मानवी जीवन सुलभ झाले असले तरी सर्जनशीलतेवर परिणाम होत असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी शाश्वत विकासासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. धोंडीराम पवार यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत AI ची भूमिका स्पष्ट करत शेती व सेवा क्षेत्रातील त्याचे महत्त्व अधोरेखित केले, मात्र अति अवलंबित्वाबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला. डॉ. प्रकाश मसराम यांनी ऐतिहासिक व पुरातत्त्व संशोधनात AI चा उपयोग स्पष्ट करत संशोधन प्रक्रियेत त्याचे महत्त्व अधोरेखित केले.
प्लेनरी सत्रात डॉ. स्मिता कुलकर्णी यांनी “Generative AI for Social Sciences” या विषयावर मार्गदर्शन करत AI चा जबाबदारीने व चिकित्सक पद्धतीने वापर करण्याचे आवाहन केले.
पेपर प्रेझेंटेशन सत्रात विविध संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. या सत्रात प्रा. संजय जगताप, डॉ. दिनकर मुरकुटे आणि डॉ. प्रतिमा कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
समारोप सत्रात प्रमुख पाहुणे मा. डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी AI च्या अति वापरामुळे मानवी विचारशक्ती कमी होण्याची शक्यता व्यक्त करत त्याचा संतुलित वापर करण्याबाबत सजग केले. या परिषदेमुळे AI, आंतरशाखीय अभ्यास व शाश्वत विकास या विषयांवर शैक्षणिक चर्चा घडून आल्या असून संशोधन क्षेत्रात नवे दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली.प्रा. बद्रीनाथ ढाकणे यांनी संपूर्ण परिषदेचा आढावा सादर केला.
आपल्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. प्रभंजन चव्हाण म्हणाले, AI जी माहिती देतो ती आपण त्यात फिड केलेल्या माहितीवर आधारित असते. त्यामुळे आपण विचारलेल्या प्रश्नाचे AI ने दिलेले उत्तर बरोबर असेलच असे नाही. त्यामुळे ते बघण्याची जबाबदारी आपली आहे.
डॉ. देवकी राठोड यांनी प्रास्ताविक करत परिषदेचे उद्दिष्ट स्पष्ट केले, तर डॉ. संदीप नन्नावरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. प्रांजली शहाणे आणि प्रा. नुपूर कारंडे यांनी केले. तर समारोप सत्राचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली सुपेकर यांनी केले. या परिषदेसाठी ११० प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!