पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी चिंचवड शहरात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत काळेवाडी पोलिसांनी थेरगाव परिसरात धडक कारवाई करत एका युवकाला पिस्तूल व जिवंत काडतूसासह अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. २१ एप्रिल) रात्री करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित दिनेश शिंदे (वय १८, रा. रमाबाई नगर, भाटनगर, पिंपरी) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील कुणाल रेसिडेन्सीच्या पाठीमागे पवार इस्टेट परिसरातील कच्च्या रस्त्यावर संशयास्पद हालचाली करणाऱ्या आरोपीची चौकशी करण्यात आली. झडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
जप्त करण्यात आलेल्या अग्निशस्त्राची किंमत सुमारे २७ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या शस्त्रावर केंद्र शासनाच्या नियमानुसार उत्पादकाचे नाव, क्रमांक अथवा अन्य ओळख चिन्ह नव्हते.
याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
काळेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.




