पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान दिघी पोलिसांनी मोठी कारवाई करत एका युवकाला देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. २१ एप्रिल) सायंकाळी मॅग्जिन चौक परिसरात करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव उमेश उर्फ अजय ब्रम्हणे (वय २०, रा. शास्त्रीनगर, येरवडा, पुणे) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल इंडस्ट्रीज ते वाळके मळा जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पद हालचाली करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ५१ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
सध्या शहरात लागू असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून आरोपीने विनापरवाना शस्त्र जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिघी पोलीस पुढील तपास करत आहेत.




