पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरात ‘कोयता गँग’ने पुन्हा एकदा दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे. कुणाल आयकॉन रोडवरील एका मोमोज दुकानावर हल्ला करून आरोपींनी तब्बल ४ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दुकानाची तोडफोड करत व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
ही घटना रविवारी (दि. २० एप्रिल) रात्री सुमारे ११.१० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सोपान बुलाखे (२१), ओंकार बाबर (२०) आणि विवेक अंबोरे (१८) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोटारसायकलवरून मोमोज दुकानाजवळ आले. त्यापैकी दोघे दुकानात घुसले आणि दुकान चालकाकडे ४ लाख रुपयांची खंडणी मागितली. व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत कोयता उगारला. तसेच दुकानातील साहित्य, लॅपटॉप आणि ग्राहकाच्या कारची काच फोडून मोठी तोडफोड केली.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाढत्या ‘कोयता गँग’च्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.




