त्रुटी दुरुस्तीसह काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना
शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिंचवडगावातील केशवनगर परिसरातील विद्युत दाहिनीच्या पार्किंग व सुशोभीकरणाच्या कामाची नगरसेवक सुरेश भोईर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. काही महिन्यांपूर्वी संबंधित कामाबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सध्या सुरू असलेल्या कामाची त्यांनी अधिकाऱ्यांसोबत तपासणी केली.
या पाहणीदरम्यान कामामध्ये आढळलेल्या काही त्रुटींबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. तसेच आवश्यक ते बदल तातडीने करून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना भोईर यांनी दिल्या.

याचबरोबर चिंचवडगावातील दशक्रिया घाट येथील पत्रा शेडची दुरवस्था देखील त्यांनी अधोरेखित केली. घाटावर अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोय होत असल्याने शेडची तात्काळ दुरुस्ती करावी, तसेच नागरिकांच्या बैठक व्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या वेळी महापालिकेचे डेप्युटी इंजिनियर अंधुरे, कनिष्ठ अभियंता प्रार्थना सोनवणे आणि तानाजी देवकर यांनीही प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित कामे दर्जेदार पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
या पाहणीमुळे परिसरातील प्रलंबित कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासनाकडून तत्परता दाखवली जाईल, अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.




