spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय संविधान दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे, सहआयुक्त मनोज लोणकर, सहशहर अभियंता विनय ओहोळ, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बुकतर,तुकाराम गायकवाड, संतोष सुरवसे,सचिन खरात, पिंटू जामदार, गणेश पुंडा, वैभव भालेराव उपस्थित होते.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या अमूल्य संविधानिक योगदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.

उद्देशिका

“आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा; आणि
त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा
संकल्पपूर्वक निर्धार करून उपस्थितांनी हे संविधान अंगीकृत, अधिनियमित आणि स्वतःप्रत अर्पण करण्याचा संकल्प केला.

भारतीय संविधान दिन हा देशाच्या लोकशाही परंपरेचा, संविधानिक मूल्यांचा आणि नागरिकांच्या अधिकार व कर्तव्यांचा गौरव करणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून महानगरपालिकेत संविधानातील स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूलभूत मूल्यांचा जागर करण्यात आला. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार, समानतेची भावना आणि सामाजिक न्यायाची संकल्पना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर यांनी बोलताना लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी संविधानाने दिलेल्या मूल्यांचे प्रत्येकाने केवळ स्मरण न करता ती अंगीकृत करणे आवश्यक आहे असे सांगितले तसेच समाजातील सर्व घटकांना समान संधी, न्याय आणि सन्मान मिळावी आणि राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ व्हावी, यासाठी संविधानाप्रती आपली जबाबदारी जपणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!