spot_img
spot_img
spot_img

महापालिकेच्या तिजोरीवर कोणाचा डल्ला? ६० कोटींच्या देयकांवरून सुलभा उबाळेंचा गंभीर आरोप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आर्थिक कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तब्बल ६० कोटी १८ लाख रुपयांच्या देयकांच्या वाटपाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या उपनेत्या तथा नगरसेविका सुलभा रामभाऊ उबाळे यांनी केली आहे. अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर निर्धारित प्रशासकीय प्रक्रिया डावलून थेट लेखा विभागाकडे १७ उपसूचना सादर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापैकी १४ उपसूचनांशी संबंधित ६० कोटी १८ लाख ६८ हजार ५३ रुपयांची देयके अदा झाल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

महापालिकेच्या २०२५-२६ च्या सुधारित आणि २०२६-२७ च्या मूळ अंदाजपत्रकाला २४ मार्च २०२६ रोजी अंतिम मंजुरी मिळाली होती. त्यानंतर उपसूचना सादर करण्यासाठी नगरसचिव विभागामार्फत निर्धारित प्रक्रिया असताना काही नगरसेवकांनी ही प्रक्रिया टाळून थेट लेखा विभागाकडे १७ उपसूचना सादर केल्याचे उबाळे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, यापैकी १४ उपसूचनांवरील देयके ३१ मार्च २०२६ रोजी अदा करण्यात आल्याचे समोर आले आहे. अवघ्या काही दिवसांत एवढ्या मोठ्या रकमेची देयके अदा करण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

नगरसचिव विभागाला डावलून उपसूचना स्वीकारण्याचा अधिकार कोणाला होता? या उपसूचनांची छाननी कोणी केली? त्यांना मंजुरी कोणत्या नियमांच्या आधारे देण्यात आली? तसेच संबंधित कामांची प्रत्यक्ष आवश्यकता आणि कामांची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

महापालिकेचा निधी हा करदात्या नागरिकांचा सार्वजनिक पैसा आहे. त्यामुळे त्याच्या विनियोगात पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त पाळणे आवश्यक आहे. उपसूचनांच्या नावाखाली नियमबाह्य पद्धतीने देयके अदा झाली असतील, तर ही बाब केवळ प्रशासकीय त्रुटी म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. या प्रकरणात संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि कंत्राटदारांची भूमिकाही तपासली पाहिजे, असे उबाळे यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक सहीची जबाबदारी निश्चित करा!

या प्रकरणातील सर्व १७ उपसूचनांच्या प्रती, मंजुरीचे आदेश, संबंधित कामांची माहिती, देयकांची तपशीलवार यादी आणि देयके अदा करण्यास मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सार्वजनिक करावीत. तसेच स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून नियमबाह्य व्यवहार आढळल्यास संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी उबाळे यांनी केली आहे.

महापालिकेच्या तिजोरीतून ६० कोटी रुपये खर्च होत असताना त्यामागील प्रक्रिया आणि जबाबदारी स्पष्ट असली पाहिजे. सत्ताधारी असोत किंवा प्रशासनातील अधिकारी, कोणालाही नियमांपेक्षा मोठे होता येणार नाही. सार्वजनिक पैशांच्या व्यवहारात मनमानी खपवून घेतली जाणार नाही. महापालिकेच्या पैशांचा हिशेब जनतेला मिळालाच पाहिजे, अशी भूमिका सुलभा उबाळे यांनी मांडली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!