spot_img
spot_img
spot_img

संविधान निर्मितीमध्ये बाबासाहेबांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवले ; ऍड. प्रार्थना सदावर्ते यांचे प्रतिपादन

विश्वबंधुता साहित्य परिषदेतर्फे आयोजित पहिल्या संविधान सन्मान महिला साहित्य संमेलनाचे उद्घाटन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 “भारतीय संविधानाच्या निर्मितीवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही अन्य बाबींपेक्षा सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून संविधानातील प्रत्येक तरतूद केली. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय, समानता आणि हक्क मिळावेत, हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता,” असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका व कायद्याच्या अभ्यासक ऍड. प्रार्थना सदावर्ते यांनी केले.

विश्वबंधुता साहित्य परिषद आणि सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचे (२६ नोव्हेंबर) औचित्य साधून पहिल्या संविधान सन्मान महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संमेलनाच्या स्वागताध्यक्ष मंदाकिनी रोकडे, कार्याध्यक्ष सायली गोसावी, विश्वबंधुता साहित्य परिषदेचे सरचिटणीस प्रा. शंकर आथरे, स्वागताध्यक्षा मंदाकिनी रोकडे आणि कार्याध्यक्षा सायली गोसावी व पत्रकार शबनम सय्यद उपस्थित होत्या. यावेळी पत्रकार शबनम सय्यद व सायली जोशी यांना संविधान सन्मान पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले.

ऍड. प्रार्थना सदावर्ते म्हणाल्या, “संविधानाच्या पहिल्या मसुद्यात बंधुता शब्द नव्हता. तेव्हा व्यक्तीच्या सन्मानासाठी व देशाच्या एकतेसाठी सर्वांमध्ये बंधुभाव विकसित करण्यासाठी बंधुता हा शब्द आवश्यक असल्याचे सांगत बाबासाहेबानी तो समाविष्ट केला. तरीही राजकीय अस्थिरता, धर्मावरुन वाद, मानवता आणि एकतेवर घाव, माणसांमध्ये शहरी-ग्रामीण, श्रीमंत-गरीब अशी दरी वाढत गेली. अशा काळात बंधुतेचा विचार सर्वांना जोडून ठेवणारा आहे. विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हा बंधुतेचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा.”

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “संविधान निर्मितीला आज ७७ वर्षे पूर्ण झाली, त्याचा आनंद आहेच. परंतु भारतीय समाज अक्षर साक्षर, संगणक साक्षर झाला पण लोकशाही साक्षर, संविधान साक्षर, राजकारण साक्षर, समाजकारण साक्षर होऊ शकलेला नाही ही खेदाची बाब असून, यावर सर्वच पातळ्यांवर विशेष प्रयत्नांची गरज आहे. ९ ऑगस्ट क्रांतीदिन, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २६ नोव्हेंबर संविधान दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या चारही सुवर्णदिनांचे आपापल्या ठिकाणी अनन्यसाधारण महत्त्व आहे. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या चारही गोष्टींबाबत जागरुकता वाढून प्रबोधन व्हायला हवे. संविधानाप्रती काही समाजघटकांमध्ये अनास्था आहे हे सत्य आहे. तो मानसिक विकार असून त्यावर बंधुता रामबाण उपाय आहे.”

या संमेलनामध्ये केंद्र सरकारने संविधानाला राष्ट्रग्रंथाचा दर्जा द्यावा, तसेच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी याप्रमाणे २६ नोव्हेंबर संविधान दिनीही राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी आणि या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करावे, असे दोन ठराव पारित करण्यात आले. प्रा. शंकर आथरे यांनी संमेलनात झालेल्या ठरावाचे वाचन केले.

मंदाकिनी रोकडे आणि सायली गोसावी यांनीही मनोगत व्यक्त केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शंकर आथरे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात संविधान सन्मान काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आलो होते. त्यात राज्यभरातील कवींनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!