शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहराच्या विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होऊ नये, तसेच नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळावे, या दोन महत्त्वपूर्ण विषयांवर प्रभाग क्रमांक २३ च्या नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्या सौ. योगिता महेश बारणे यांनी महापालिका आयुक्तांकडे ठाम भूमिका मांडली आहे. प्राधिकरण आणि रिंगरोडमुळे बाधित झालेल्या घरमालकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी सविस्तर निवेदन दिले असून, रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी प्रस्तावित १०० ते १५० कोटी रुपयांच्या खर्चाचाही पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात योगिता बारणे यांनी स्पष्ट केले आहे की, प्रभागातील जवळपास ५० ते ६० टक्के परिसर प्राधिकरणबाधित असून, रिंगरोडच्या आरक्षणामुळे अनेक कुटुंबांच्या घरांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. १९८० ते १९९० या काळात भोसरी एमआयडीसी आणि औद्योगिक वसाहतींमुळे रोजगाराच्या शोधात आलेल्या कामगारांनी येथे घरे बांधून संसार उभे केले. शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या या सामान्य नागरिकांच्या घरांवर आज अनिश्चिततेची टांगती तलवार आहे.
या बाधित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये संपूर्ण बाधित परिसराचे सर्वेक्षण करून घरांची व जागांची प्रत्यक्ष नोंद करणे, सातबारा उपलब्ध नसलेल्या पात्र नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी विशेष मोहीम राबवणे, बाधित घरमालकांना योग्य मोबदला किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आणि धरणग्रस्त व झोपडपट्टी पुनर्वसनाच्या धर्तीवर स्वतंत्र पुनर्वसन धोरण तयार करणे, या मागण्यांचा समावेश आहे.
दुसरीकडे, शहराच्या पाणीपुरवठ्याबाबतही योगिता बारणे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राच्या टप्पा क्रमांक १ आणि २ च्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी तब्बल १०० ते १५० कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, एवढा मोठा खर्च करण्यापूर्वी पर्यायी स्वच्छ जलस्रोतांचा शोध घेऊन त्यावर गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही नागरिकांना वर्षभर नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. तसेच रावेत, पुनावळे आणि परिसरातील वाढते नागरीकरण, सोसायट्यांमधील सांडपाणी व्यवस्थापन आणि मैलामिश्रित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
केवळ पाण्यावर प्रक्रिया करून नागरिकांना पाणीपुरवठा करणे पुरेसे नसून, पाण्याच्या मूळ स्रोताची गुणवत्ता चांगली असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि सुरक्षित नैसर्गिक जलस्रोत शोधून त्यातून पाणी उपलब्ध करण्याला प्राधान्य द्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.
यावेळी योगिता बारणे यांनी बाधित कुटुंबांच्या बाजूने ठाम भूमिका मांडताना, शहराचा विकास निश्चितच व्हावा; मात्र विकासाच्या नावाखाली सामान्य माणसाचा संसार उद्ध्वस्त होता कामा नये, असे स्पष्ट केले. प्रशासनाने या प्रश्नांकडे केवळ विकासकामे किंवा भूसंपादन म्हणून न पाहता हजारो कुटुंबांच्या भविष्याचा आणि त्यांच्या न्याय्य हक्कांचा प्रश्न म्हणून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शहराचा विकास आणि नागरिकांचे हक्क या दोन्ही गोष्टींचा समतोल राखत बाधित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण शेवटपर्यंत लढा देणार असल्याचा निर्धार नगरसेविका योगिता महेश बारणे यांनी व्यक्त केला आहे.




Total Users : 244324