spot_img
spot_img
spot_img

आम्हा कलाकारांचा आत्मा एक – समर नखाते

शबनम न्यूज | प्रतिनिधी
नाट्य महोत्सवांच्या निमित्ताने एखाद्या वारी किंवा  जत्रेप्रमाणे कलाकार ठिकठिकाणी कला सादरीकरणासाठी फिरत असतो. आम्ही सगळे कलाकार कोणत्या नात्याने एकमेकांशी जोडले आहोत हा विचार आला की उत्तर मिळते ते म्हणजे आम्हा कलाकारांचा आत्मा एक आहे, असे वक्तव्य भारतीय चित्रपट डिव्हिजनचे माजी विभागप्रमुख समर नखाते यांनी केले. रंगानुभूति :पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोगकला महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी (२४ नोव्हेंबर) मंगळवारी ते गदिमा नाट्यगृह निगडी येथे बोलत होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी, पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या वतीने २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोगकला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या महोत्सवाच्या सांगतेवेळी कलाकार आणि महाराष्ट्रातील प्रायोगिक नाट्य चळवळीत विशेष योगदान देणा-या संस्थांचा प्रयोगकला सन्मानाने गौरव करण्यात आला.
नखाते म्हणाले, जगभरात कलेच्या नात्याने या मंडळींची नाळ एकमेकांशी घट्ट जोडली गेली आहे.  हे नातं आम्हाला जगवायच आहे त्यासाठी रंगमंच  साथ देतो. महोत्सवामुळे कलाकार एकमेकांशी जोडले जात असून प्रेक्षकांना उत्तम कलाकृतींचा आस्वाद मिळतो. नाट्य प्रयोगकला महोत्सवाला सर्वांची साथ गरजेची आहे. रंगानुभूति महोत्सवाला पिंपरी चिंचवड महापालिकेची साथ मिळते आहे हे कौतुकास्पद आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीच्या ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे म्हणाले,
नाट्य प्रयोगकला महोत्सव ही अशी जागा आहे जिथे समान काम करणारे रंगकर्मी एकत्र येतात.  एरवी पाहाता येणार नाही अशा नाटकांचे भारतभरातील प्रयोग आपल्याला नाट्य महोत्सवांत पाहायला मिळतात.  महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भाषेतील नाटकांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होते. थिएटर वर्कशॉप कंपनी ही संस्था शहरात चार वर्षे रंगानुभूति महोत्सव भरवत असून मागील दोन वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिका या महोत्सवासोबत आहे ही महत्वाची बाब म्हणता येईल. मागील वर्षीचा महोत्सव दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झाला होता. त्यावेळी त्यांनी इतर मुलभूत कामांप्रमाणेच नाट्यमहोत्सव भरवणे ही मुलभूत बाब असल्याचे नमूद केले होते, असा कौतुकास्पद विचार असणारे पवार आपल्यात नसल्याची खंत व्यक्त केली.
प्रायोगिक नाट्य चळवळ अधिक वृद्धींगत करणा-या महाष्ट्रातील संस्थांचा प्रयोगकला सन्मानाने यावेळी सन्मान करण्यात आला. यात उत्कर्ष कलाविष्कार, (भुसावळ) अग्नीमित्र (पुणे), संवाद (सातारा), चिंचवड मल्याळम समाज (चिंचवड), महाराष्ट्रीय कलोपासक (पुणे) या संस्थांचा समावेश होता. आसाममधील बाडुनगडुप्पा संस्थेचे रंगकर्मी मदन राभा, निलोत्पल बरुआ यांच्या कार्यशाळा आणि  सादरीकरणासाठी विशेष सन्मान देण्यात आला. पिंपरी चिंचवडच्या चित्रकारांकडून शेती करणारी महिला, निसर्ग या विषयांवरील चित्रे प्रदर्शनात सादर करण्यात आली होती. यासाठी विशेष योगदान असलेल्या संस्कार भारती संस्थेचा देखील सन्मान करण्यात आला.
महोत्सवाच्या चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात फिजिकल थिएटर विषयीची कार्यशाळा राष्ट्रीय नाट्य विद्यालयात स्टेज मॅनेजर असलेल्या अभिषेक मुद्गल यांनी घेतली. दुस-या सत्रात ‘एबॉन्ग आमरा’ या पश्चिम बंगाल येथील संस्थेने ‘राधा कृष्ण’ हे अतिशय सुंदर नाटक सादर केले. सन्मान सोहळ्यानंतर ‘तमाशा थिएटर’ यांचे ‘ओट्टम बोर्न टु रन’ हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर पवार यांनी केले. अमृता ओंबळे यांनी आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!