spot_img
spot_img
spot_img

भारतीय संघात चमकलेल्या महाराष्ट्राच्या पाच कबड्डीपटूंचा भोसरीत गौरव

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय कबड्डी संघात स्थान मिळवून देशासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या पाच कबड्डीपटूंचा भोसरीत विशेष सन्मान करण्यात येणार आहे. शिवम पठारे, शुभम शिंदे, आदित्य शिंदे, अजित पवार आणि पंकज मोहिते यांचा गौरव आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते होणार आहे. ‘धर्मवीर कबड्डी प्रीमियर लीग’च्या वतीने आयोजित हा सोहळा शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता बापुजी बुवा चौकातील कै. मारुती रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात पार पडणार आहे.

स्थानिक मैदानापासून भारतीय संघापर्यंत मजल मारणाऱ्या या खेळाडूंचा प्रवास नवोदित कबड्डीपटूंना प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी आयोजित सोहळ्यास खेळाडू, प्रशिक्षक आणि कबड्डीप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनने पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ‘धर्मवीर कबड्डी प्रीमियर लीग’चे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी देणे हा लीगचा उद्देश आहे. त्यासाठी शनिवार, २१ आणि रविवार, २२ नोव्हेंबर रोजी याच संकुलात निवड चाचणी होणार आहे.

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनशी संलग्न प्रत्येक संघाला १८ वर्षांवरील जास्तीत जास्त १० खेळाडूंची नावनोंदणी करता येणार आहे. प्रत्येक खेळाडूचा स्वतंत्र अर्ज आणि संस्थेच्या अधिकृत लेटरहेडवरील खेळाडूंची यादी संयोजन समितीकडे द्यावी लागेल. या यादीवर संस्थेच्या अध्यक्षांची किंवा सचिवांची स्वाक्षरी आवश्यक आहे. चाचणीत पात्र ठरलेल्या खेळाडूंची लीगमधील संघांसाठी निवड लिलाव पद्धतीने होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

“भारतीय कबड्डी संघापर्यंत मजल मारणाऱ्या शिवम पठारे, शुभम शिंदे, आदित्य शिंदे, अजित पवार आणि पंकज मोहिते यांच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते या पाचही खेळाडूंचा भोसरीत सन्मान होत आहे. त्यांचा प्रवास पाहून पुणे जिल्ह्यातील तरुण खेळाडूंनाही भारतीय संघात खेळण्याचं स्वप्न पाहण्याचं बळ मिळेल. त्या दिशेने पहिलं पाऊल टाकण्यासाठी आणि आपलं कौशल्य दाखवण्यासाठी ‘धर्मवीर कबड्डी प्रीमियर लीग’च्या निवड चाचणीत स्थानिक खेळाडूंनी सहभागी व्हावं.”

– सुनील लांडे, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!