शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसू लागले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून सात स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार असून, यामध्ये भाजपचे युवा नेते मयूर काळभोर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मयूर काळभोर यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या शब्दाचा मान राखत महानगरपालिका निवडणुकीतून माघार घेतली होती. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक व राजकीय उपक्रम राबविले आहेत. पक्षासाठी केलेले काम, निष्ठा आणि संघटनात्मक योगदान लक्षात घेता त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून महानगरपालिकेच्या सभागृहात संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षाकडून त्यांना योग्य संधी मिळणार का, याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले होते. आता स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर मयूर काळभोर यांचे नाव चर्चेत आल्याने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, उद्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून कोणाला संधी मिळणार आणि मयूर काळभोर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का, याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष लागले आहे.
आता सर्वांचे लक्ष उद्याच्या सर्वसाधारण सभेकडे! मयूर काळभोर यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.




Total Users : 242003