पत्रकार, कलाकार आणि पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव; संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शबनम न्यूज | प्रतिनिधी
संगीताचा सुरेल आविष्कार, गायकांच्या सुमधुर स्वरांची मेजवानी, कलाकारांचे बहारदार सादरीकरण आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ‘आपला म्युझिकल ग्रुप’चा ५० वा संगीत सोहळा आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. संगीतप्रेमी प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. यावेळी पत्रकार, कलाकार आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन अनिल घाडगे यांनी केले होते. सहआयोजक विजय कांबळे, रणजीत पाटील, विद्या हजारे आणि सुषमा वनारसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संगीतमय सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या पूर्वार्धाचे सूत्रसंचालन सीमा सुतार यांनी केले, तर पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाची सांगता नेहा दंडवते यांनी केली.
या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर, नगरसेविका योगिताताई नागरगोजे आणि नगरसेवक तुषार सहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या शुभहस्ते पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यामध्ये पत्रकार श्रावण जाधव (सकाळ), अमोल काकडे (उपसंपादक, पुण्यनगरी), बापूसाहेब गोरे (संपादक, माझा आवाज), सूरज साळवे (संपादक, लोकन्याय न्यूज), शबनम सय्यद (संपादिका, शबनम न्यूज), माधुरी कोराड (अध्यक्षा, पिंपरी-चिंचवड महिला पत्रकार संघ), अनिल कातळे (संपादक, वेध न्यूज) आणि श्रीधर जगताप (संपादक, प्रभाकर न्यूज) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल विठ्ठल नाना वाळुंज यांना पर्यावरण पुरस्काराने गौरविण्यात आले.
चित्रपट अभिनेत्री आर्या घारे, दैवशाला घाडगे, आयुब खान आणि अनिल गायकवाड यांना ‘पुणेरी कलारत्न पुरस्कार’, तर शशिकांत वाडते आणि सीमा पोडाला यांना ‘कलाकार पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
संगीत कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक आणि गायिकांनी आपल्या सुरेल आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आयोजक अनिल घाडगे यांच्यासह रणजीत पाटील, विजय कांबळे, संजय मिश्रा, प्रसाद माने, दत्ता लोहार, विकास जगताप, मोहन भस्मे आणि के. संग्राम यांनी गायनातून कार्यक्रमात रंगत आणली. तसेच नेहा दंडवते, विद्या हजारे, सुषमा वनारसे, शुभांगी पवार, मंगल लोहर, छाया अय्यर, संगीता खरवडे, विद्या कोकणे आणि सीमा पोडाला यांनीही आपल्या सुमधुर गीतांनी रसिकांची दाद मिळवली.
बालकलाकार दुर्वेश घाडगे, काव्या वडतकर आणि प्रीता पाखरे यांनी आपल्या नृत्याविष्कारातून कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली. त्यांच्या कलाविष्काराला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल जगताप, उमाकांत पवार, शिवानंद मगदूम, अजिंक्य पोटे, अनिल बिरादार, मुबारक पानसरे आणि अनिल सौंदडे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळताना साऊंडची जबाबदारी महेश यांनी, व्हिडिओ चित्रीकरणाची जबाबदारी शीला लाहिगुडे यांनी, तर फोटोग्राफीची जबाबदारी दत्ता लोहार यांनी पार पाडली.
दरम्यान, ग. दि. माडगूळकर नाट्यगृहातील काही अडचणी आणि आवश्यक सुविधांबाबत आयोजकांनी उपमहापौर शर्मिलाताई बाबर तसेच उपस्थित नगरसेवकांकडे मागण्या मांडल्या. यावर उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांनी संबंधित मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक आश्वासन दिले.
प्रवेश विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमींचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून आयोजकांनी समाधान व्यक्त केले. ‘आपला म्युझिकल ग्रुप’च्या ५० व्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर आगामी काळातही यापेक्षा अधिक भव्य आणि दर्जेदार संगीत कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.




Total Users : 240090