spot_img
spot_img
spot_img

महापालिकेच्या मुख्य सभागृहात अजितदादांचे भव्य तैलचित्र लावा!; नाना काटे यांची मागणी

 शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे भव्य तैलचित्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात दर्शनी भागात सन्मानपूर्वक लावण्यात यावे, अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत आणि विकासाच्या वाटचालीत स्व. अजितदादा पवार यांचे योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि नियोजनबद्ध विकासाच्या संकल्पनेमुळे शहराने राज्यासह देशाच्या नकाशावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा यथोचित गौरव होणे आवश्यक असल्याचे काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

शहरातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा तसेच विविध विकासकामांना गती देण्यात अजितदादांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि केलेले प्रयत्न पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत. पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा इतिहास लिहिताना त्यांच्या योगदानाचा उल्लेख सुवर्णाक्षरांनी करावा लागेल, अशी भावना नाना काटे यांनी व्यक्त केली.

महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात येणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना अजितदादांच्या कार्याची कायमस्वरूपी आठवण राहावी, तसेच त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांचे भव्य तैलचित्र सभागृहाच्या दर्शनी भागात लावण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान करणे ही महापालिकेची जबाबदारी असून, अशा उपक्रमातून शहराच्या विकासाचा इतिहास आणि नेतृत्वाचा वारसा जपला जाईल. त्यामुळे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंतीही नाना काटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!