रेल्वे फाटकावरील प्रतीक्षा संपणार; नागरिकांचा प्रवास होणार विनाथांबा, वेळ आणि इंधनाची होणार बचत…
शबनम न्यूज : प्रतिनिधी
पिंपरी, दि. ५ नोव्हेंबर २०२६ : – पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान, सुरक्षित आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते आज पार पडले. या दोन्ही विकासकामांमुळे शहरातील पायाभूत सुविधांमध्ये भर पडणार असून, नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे

महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी महापौर योगेश बहल यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,आर.पी.आय.गटनेते कुणाल वाव्हळकर, नगरसदस्य जितेंद्र ननावरे, कुशाग्र कदम, संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, पंकज भालेकर,विराज लांडे,धर्मपाल तंतरपाळे ,नगरसदस्या संगिता ताम्हाणे, भीमाताई फुगे,मनीषा लांडे, वर्षा जगताप, निकिता कदम, प्रियांका कुदळे, प्रतीक्षा जवळकर,सारिका मासुळकर, अरूणा लंघोटे,अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, माजी नगरसदस्य राजेंद्र जगताप,शाम लांडे,माजी नगरसदस्या सीमा सावळे, सुनिता वाघेरे,सुजाता पालांडे, आशा शेंडगे, उपायुक्त अण्णा बोदडे, अतुल पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
रेल्वे फाटकावरील प्रतीक्षा संपणार; वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा..
पिंपरी डेअरी फार्म येथे उभारण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक (एल सी नं.६०) बंद होणार आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना रेल्वे फाटक बंद असताना थांबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. दापोडी-निगडी रस्त्याकडून पिंपरी गावात जाणाऱ्या नागरिकांना आता विनाथांबा प्रवास करता येणार असून, त्यामुळे प्रवासाचा वेळ व श्रम कमी होण्याबरोबरच इंधनाचीही बचत होणार आहे.
पिंपरी, पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील नागरिकांना दापोडी-निगडी रस्त्याला पोहोचण्यासाठी हा मार्ग अधिक सोयीचा आणि जवळचा पर्याय ठरणार आहे. यामुळे परिसरातील अंतर्गत वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होईल. तसेच शगुन चौकमार्गे इंदिरा गांधी पुलावरून दापोडी-निगडी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ कमी होण्यास मदत होणार आहे.
याशिवाय, पिंपरी, पिंपळे सौदागर आणि रहाटणी येथील नागरिकांना संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनपर्यंत जलदगतीने पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. रेल्वे फाटकामुळे निर्माण होणारा विलंब टाळता येणार असल्याने दैनंदिन कामासाठी प्रवास करणारे नागरिक, नोकरदार वर्ग तसेच वाहनचालकांना या पुलाचा मोठा फायदा होणार आहे.
असा साकारला पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपूल..
पिंपरी डेअरी फार्म येथे रेल्वे उड्डाणपूल उभारण्याच्या प्रकल्पासाठी स्वीकृत निविदा रक्कम ६५.२८ कोटी रुपये आहे. या उड्डाणपुलाची एकूण लांबी ५६५ मीटर आणि रुंदी १७.२ मीटर आहे. रेल्वे स्पॅन वगळता व्हायाडक्टची लांबी २४० मीटर असून, त्याची रुंदी १७.२ मीटर आहे. रेल्वे लाईनवरील व्हायाडक्टची लांबी ४५ मीटर आणि रुंदी १९.५ मीटर आहे. या दोन्ही ठिकाणी पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पदपथाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दापोडी-निगडी रस्त्याकडील पोहोच रस्त्याची लांबी १३५ मीटर, तर रुंदी १७.२ मीटर आहे. पिंपरी बाजूकडील पोहोच रस्त्याची लांबी १४५ मीटर आणि रुंदी १७.२ मीटर आहे.
सेवा रस्त्यांच्या कामामध्ये दापोडी-निगडी रस्त्याकडील पुलाच्या पोहोच रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या रेल्वे ट्रॅकपर्यंतच्या सेवा रस्त्याची लांबी २८५ मीटर आणि रुंदी ९.४ मीटर आहे. तसेच पिंपरी बाजूकडील पुलाचा पोहोच रस्ता ते पॉवर हाऊस चौक (विणा सर्कल) पर्यंतच्या रस्त्याची लांबी ७१५ मीटर आणि रुंदी १८ मीटर आहे. या दोन्ही सेवा रस्त्यांवरही पदपथाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांसोबतच पादचाऱ्यांनाही या मार्गाचा वापर करणे अधिक सोयीचे होणार आहे.
या प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून एकूण ५.९६ एकर क्षेत्र जुलै २०२२ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले होते. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली.
ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीमुळे प्रशासकीय कामकाजाला मिळणार नवी सुविधा…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. क्षेत्रीय कार्यालय हे नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यातील महत्त्वाचे संपर्क केंद्र आहे. परिसरातील नागरिकांना विविध नागरी सुविधा, तक्रारींचे निवारण आणि प्रशासकीय कामकाजासाठी क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयासाठी सुसज्ज आणि सोयीस्कर इमारत उभारण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नूतन इमारतीमुळे प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास तसेच नागरिकांना सेवा देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार वेगाने होत असून, वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीमुक्त, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देणे ही महापालिकेची महत्त्वाची प्राथमिकता आहे. पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपूल हा नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडथळा दूर करणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या पुलामुळे केवळ दोन भागांमधील अंतर कमी होणार नाही, तर परिसरातील व्यापार, उद्योग आणि दैनंदिन व्यवहारांनाही चालना मिळेल.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करताना केवळ सध्याच्या गरजांचा विचार न करता भविष्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि शहराचा विस्तार लक्षात घेऊन पायाभूत सुविधा विकसित करणे आवश्यक आहे. पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपूल हा त्याच दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रकल्प आहे. या पुलाची रचना, पोहोच रस्ते आणि सेवा रस्त्यांचे नियोजन करताना वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुविधांचाही विचार करण्यात आला आहे.तसेच या पुलामुळे शगुन चौक,साई चौक येथील वाहतुक कोंडी तसेच पिंपरी पुलावरील ताण कमी होणार आहे,रेल्वे फाटकामुळे होणारा विलंब टळल्याने वाहनचालकांच्या वेळेची बचत होऊन वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरात दर्जेदार आणि नागरिककेंद्रित पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे.
डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका




Total Users : 236637