शबनम न्यूज | प्रतिनिधी
मुंबईमध्ये खून झाला असून त्याचा तपास सुरू आहे, असे सांगत पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या दोन अनोळखी भामट्यांनी ७२ वर्षीय वृद्धाच्या हातातील सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हातचलाखीने काढून घेतली. ही घटना देहूरोड परिसरात जुना मुंबई-पुणे महामार्गालगत घडली.
याप्रकरणी सुभाषचंद्र ब्रह्मदेव पांडे (वय ७२, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी जुना मुंबई-पुणे महामार्गावरील सेंट ज्युड शाळेसमोरून जात होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले.
आम्ही पोलीस अधिकारी आहोत. मुंबईमध्ये खून झाला असून खून कोणी केला आहे, याचा शोध सुरू आहे, असे सांगून त्यांनी फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर हातचलाखीने फिर्यादींच्या हातातील सोन्याची अंगठी काढून ती कागदात ठेवण्यास सांगितले. याच दरम्यान आरोपींनी हातचलाखी करून सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लंपास केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पोलिसांत धाव घेतली. देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.




Total Users : 235292