spot_img
spot_img
spot_img

इंडिया ज्वेलरी पार्कमुळे महाराष्ट्र जागतिक दागिने उत्पादन व निर्यातीचे केंद्र बनेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ, सुरक्षित औद्योगिक वातावरण आणि उद्योजकतेची परंपरा यांच्या बळावर महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील दागिने उत्पादन व निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्याची क्षमता आहे. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीशी जुळवून घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि शासन व उद्योग यांच्या समन्वयातून ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ हा प्रकल्प दागिने उद्योगाच्या भविष्यातील विकासाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

नवी मुंबईतील महापे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह, रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष किरीट भन्साळी, उपाध्यक्ष शौनक पारिख आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या औद्योगिक सामर्थ्याला जागतिक संधींची जोड

मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ आणि व्यावसायिकतेची जागतिक स्तरावर ओळख आहे. रत्न व आभूषण उद्योगासाठी आवश्यक असलेले कुशल कारागीर, उद्योजकता, व्यापाराचे अनुभवसंपन्न जाळे आणि अनुकूल औद्योगिक वातावरण ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत. या सामर्थ्याचा उपयोग करून राज्याला जागतिक दागिने उद्योगातील महत्त्वाचे केंद्र बनविण्याची संधी इंडिया ज्वेलरी पार्कच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

बदलत्या जागतिक व्यापाराशी जुळवून घेण्याचे आवाहन

जागतिक स्तरावरील बदलती परिस्थिती आणि अमेरिका व चीनसारख्या मोठ्या बाजारपेठांमधील घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासमोर नवी आव्हाने निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत उद्योगांनी बदलत्या बाजारपेठांचा अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनातील नावीन्य आणि निर्यातीच्या नव्या संधींचा स्वीकार करणे आवश्यक आहे. इंडिया ज्वेलरी पार्क या बदलांना सामोरे जाण्यासाठी दागिने उद्योगाला आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

इंडिया ज्वेलरी पार्क उद्योगाच्या भविष्याचा महत्त्वपूर्ण टप्पा

महापे येथील २२ एकर क्षेत्रावर अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र विकसित करण्यात येत आहे. हा प्रकल्प उद्योगाच्या दीर्घकालीन विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. आजपासून ३० ते ४० वर्षांनंतर मागे वळून पाहताना इंडिया ज्वेलरी पार्कच्या उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्या उद्योग क्षेत्रातील नेतृत्वाचे निश्चितपणे स्मरण केले जाईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

उद्योग उभारणीसाठी केवळ जमीन उपलब्ध करून देणे पुरेसे नसून, वीज, पाणी, रस्ते, भांडवल, पायाभूत सुविधा आणि विविध विभागांच्या परवानग्या वेळेत मिळणे आवश्यक आहे. इंडिया ज्वेलरी पार्कच्या कामात कोणत्याही अडचणी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी तत्परतेने मदत करावी. प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी शासन आणि उद्योग यांच्यातील समन्वय व भागीदारी महत्त्वाची आहे. उद्योगांच्या गरजा समजून घेऊन आवश्यक सुविधा आणि प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्याची शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!