शबनम न्यूज | प्रतिनिधी
नवोदितांपासून ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सर्वांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने सुरू झालेल्या ‘कलाकार कट्टा’ने यशस्वी वर्षपूर्तीचा टप्पा गाठला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाच्या बाराव्या पुष्पात विविध कलाविष्कारांची रंगतदार मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली. गायन, कविता, भारूड, जोगवा, वाद्यवादन, चित्रकला आणि नाट्यछटा अशा विविध कलाप्रकारांनी सजलेल्या या सोहळ्यात कलाकारांनी आपल्या प्रतिभेची प्रभावी छाप उमटवली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी चिंचवड येथील पंडित पद्माकर कुलकर्णी कलादालन, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘वर्षपूर्ती हक्काच्या मंचाची, नांदी नव्या पर्वाची!’ ही या सोहळ्याची संकल्पना वर्षभरातील यशस्वी वाटचालीचे प्रतीक ठरली.
कार्यक्रमात शालन पायगुडे यांनी कराओके गायन सादर करून रसिकांची दाद मिळवली, तर शशिकला देवकर यांनी कवितेचे सादरीकरण केले. आकाश थिटे आणि आसाराम कसबे यांनी झांज व ढोलकी या वाद्यांची माहिती देत त्यांच्या वैशिष्ट्यांची ओळख करून दिली. त्यानंतर ऋषिकेश गायकवाड आणि ओंकार गायकवाड यांनी वाद्यांचे सादरीकरण केले.
मधुषा भागवत यांच्या चित्रांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. राजश्री वाघमारे यांनी भारूड सादर केले, तर माधुरी डिसूजा आणि शीला पाटील यांनी जोगवा सादरीकरणातून लोककलेचा आविष्कार घडवला. राज अहेरराव यांनी बोधकथा सादर केली, तर श्रिजा पोवार यांच्या पियानो वादनाने कार्यक्रमात सुरांची रंगत भरली.
जयश्री श्रीखंडे यांनी अभिवाचनातून शब्दांना भावपूर्ण अभिव्यक्ती दिली, तर आसाराम कसबे यांनी लोकवाद्याचे सादरीकरण केले. सुखदा शिंदे, देवज दीक्षित आणि दिविजा दीक्षित यांनी नाट्यछटांच्या माध्यमातून अभिनयकौशल्याचे दर्शन घडवले. प्रत्येक सादरीकरणाने कार्यक्रमात वैविध्य निर्माण केले आणि उपस्थित रसिकांकडून कलाकारांना उत्स्फूर्त दाद मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरी लोंढे यांनी केले. त्यांनी ‘कलाकार कट्टा’च्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेत या उपक्रमामागील संकल्पना आणि उद्देश स्पष्ट केला. नवोदित कलाकारांना सादरीकरणाची संधी मिळावी, अनुभवी कलाकारांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने ‘कलाकार कट्टा’चे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रकाश ढवळे यांनी आभार मानले.
एका संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘कलाकार कट्टा’च्या प्रवासाने बारा पुष्पांच्या माध्यमातून अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली. कलाकारांचा उत्साह, रसिकांची दाद आणि विविध कलाप्रकारांना मिळालेले व्यासपीठ ही या उपक्रमाच्या वर्षपूर्तीची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली.
भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता कलाकारांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणारे व्यासपीठ म्हणून पुढे येत आहे. कलेचा सन्मान, प्रतिभेला संधी आणि नवोदितांच्या स्वप्नांना बळ देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या उपक्रमाने वर्षपूर्तीच्या निमित्ताने नव्या सांस्कृतिक पर्वाची नांदी केली आहे.




Total Users : 233533