रद्दीच्या कागदांपासून रावणाची भव्य प्रतिकृती; अकराव्या तोंडातून पाणीबचतीचा संदेश, स्वयंसेवकांच्या एकजुटीचे दर्शन
पिंपरी-चिंचवड : सण-उत्सवातील भव्य देखावे आणि आकर्षक सजावटीमागे अनेक हात अहोरात्र मेहनत घेत असतात. मात्र, त्यांच्या योगदानाची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. वाकड-थेरगाव येथील भगवती रॉयल हौसिंग सोसायटीच्या नवरात्रोत्सवात रावणनिर्मिती पथकाने केलेले काम अशाच पडद्यामागील नायकांची ओळख करून देणारे ठरले आहे. गेल्या १४ वर्षांपासून सामूहिक सहभागातून उत्सवाची परंपरा जपणाऱ्या या रहिवाशांनी यंदा पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि पाणीबचतीचा सामाजिक संदेश देत रावणाची प्रतिकृती साकारली.
रावणाच्या अकराव्या तोंडातून पाणीबचतीचा जागर!
यंदाच्या रावण दहनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक दहा तोंडांसोबत पाणीबचतीचा संदेश देणारे अकरावे तोंड. महाराष्ट्रातील पाणीटंचाई, दुष्काळ आणि पाण्याचा वाढता अपव्यय या प्रश्नांकडे नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या संकल्पनेतून करण्यात आला. धार्मिक परंपरेला सामाजिक जाणिवेची जोड देत प्रत्येकाने पाण्याचा प्रत्येक थेंब जपावा, असा संदेश रहिवाशांनी दिला.
रद्दीपासून भव्य प्रतिकृती; रहिवाशांचाच पुढाकार
रावणनिर्मितीसाठी सोसायटीतील रहिवाशांकडून जुने कागद आणि रद्दी गोळा करण्यात आली. बांबू, कडबा, रंगकाम, रेखाचित्रे आणि सजावटीसाठी आवश्यक साहित्याची जमवाजमव करून स्वयंसेवकांनी आपल्या कौशल्याचा उपयोग केला. रावणाची प्रतिकृती उभारण्यापासून सजावट, विद्युत रोषणाई आणि स्टेज उभारणीपर्यंतची जबाबदारी रहिवाशांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. बाहेरील व्यावसायिक एजन्सीवर अवलंबून न राहता एकजुटीच्या बळावर हा देखावा साकारण्यात आला.
या उपक्रमात उत्सव मंडळाचे अध्यक्ष मयूर पवार, उपाध्यक्ष उमेश पेंडभाजे, खजिनदार चिंतन कंसारा यांच्यासह अनमोल पाटील, मनोज चौधरी, सतीश कोलगे, अमोल वाघ, प्रभाकर कुमार, मयंक अग्रवाल, राहुल जहागीरदार, मनीषराज सत्य, हर्षल कोळी, सचिन आणि इतर रहिवाशांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. नियोजन, साहित्य संकलन, प्रतिकृतीची उभारणी आणि अंतिम सजावट अशा प्रत्येक टप्प्यावर स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.
रावण दहनाच्या वेळी आवश्यक अग्निसुरक्षा आणि खबरदारी घेण्यासाठी सोसायटीच्या व्यवस्थापन समितीनेही सहकार्य केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे देखाव्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरली.
‘पापा, पानी की हर बूंद बचाओ ना…’
पाणीबचतीचा संदेश केवळ रावणाच्या अकराव्या तोंडापुरता मर्यादित राहिला नाही. सोसायटीच्या व्यवस्थापन समितीने पारंपरिक पद्धतीने गाड्या धुण्याच्या प्रथेला बंदी घातली होती. तसेच एका लहान मुलीने तयार केलेल्या रीलद्वारे पाण्याचे महत्त्व भावनिक पद्धतीने अधोरेखित करण्यात आले.
‘पापा, पानी की हर बूंद बचाओ ना… मुझे बड़े होकर इस खूबसूरत दुनिया में जीना है,’ या भावनिक संदेशातून पुढील पिढीसाठी पाणी जपण्याचे आवाहन करण्यात आले. पाणीबचतीच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेणाऱ्या रहिवाशांना प्रोत्साहन म्हणून पुस्तके भेट देण्यात आली.
‘एक सोसायटी, एक उत्सव’; १४ वर्षांची एकजुटीची परंपरा
भगवती रॉयल हौसिंग सोसायटीमध्ये गेल्या १४ वर्षांपासून ‘एक सोसायटी, एक उत्सव’ या भावनेतून विविध सण सामूहिकरीत्या साजरे केले जातात. या परंपरेतून केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी, परस्पर सहकार्य आणि कौटुंबिक जिव्हाळाही जपला जात आहे.
२०१९ मधील महापुराच्या काळात मंडळाने पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली होती. धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांबरोबरच सामाजिक प्रश्नांप्रती संवेदनशीलता जपण्याची भूमिका सोसायटीने वेळोवेळी अधोरेखित केली आहे.
या १४ वर्षांच्या प्रवासात राजहंस पाटील, अविनाश देशमुख, राहुल दसरे, रिपेन भाई, विक्रम, वरद जोशी, रघु उज्जेनकर, जयप्रकाश नागमोडे, अमित टिंगरे, मुकेश बाफना, विघ्नेश नायक, सुबोध कुंभार, शिंत्री साहेब, कौस्तुभ भादेकर, विनय कुलकर्णी, रवींद्र उत्तेकर, निकम सर यांच्यासह विविध काळात योगदान देणाऱ्या अनेक स्वयंसेवकांचा सहभाग राहिला आहे.
‘BR Family’चा जिव्हाळा कायम
काळानुसार पुणे-मुंबईसह परदेशात स्थायिक झालेले काही जुने रहिवासीही शक्य असल्यास आपल्या कुटुंबासह या उत्सवात सहभागी होतात. प्रत्यक्ष उपस्थित राहता न आलेले रहिवासी कार्यक्रमाचे व्हिडिओ मागवून समाजमाध्यमांवर शेअर करतात. ‘BR Family’ या भावनेतून जपला जाणारा हा जिव्हाळा सोसायटीच्या सामूहिक परंपरेची साक्ष देतो.
महिलांचा सक्रिय सहभाग, मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन, सामाजिक प्रश्नांवरील जनजागृती आणि स्वयंसेवकांची मेहनत ही भगवती रॉयलच्या नवरात्रोत्सवाची वैशिष्ट्ये ठरली आहेत.
रावणाची भव्य प्रतिकृती पाहताना प्रेक्षकांचे लक्ष तिच्या आकाराकडे आणि सजावटीकडे वेधले जाते; मात्र त्यामागील नियोजन, श्रम आणि समर्पण अनेकदा नजरेआड राहते. भगवती रॉयलचे रावणनिर्मिती पथक या अनामिक योगदानाचे प्रतीक आहे. प्रसिद्धीपेक्षा सामूहिक आनंदाला आणि देखाव्यापेक्षा सामाजिक संदेशाला महत्त्व देणाऱ्या या स्वयंसेवकांनी १४ वर्षांची परंपरा जपत एकजुटीचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श पुढे ठेवला आहे.




Total Users : 233514