शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिंचवड गावातील नागरिकांना पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करता यावेत, यासाठी महापालिकेचे नगरसेवक तथा विधी समितीचे सदस्य शेखर बबनराव चिंचवडे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. चिंचवड-काळेवाडी पुलाजवळील स्मशानभूमीत लाकूड आणि गोवऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन लोखंडी (बिडाचे) रॅक बसवून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासाठी आमदार शंकरभाऊ जगताप आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला आहे. तसेच संबंधित जागेची पाहणीही करण्यात आली आहे.
चिंचवड गावातील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी महाराज समाधी मंदिरापासून काही अंतरावर असलेली स्मशानभूमी अनेक पिढ्यांपासून स्थानिक नागरिकांच्या पारंपरिक अंत्यसंस्कारासाठी वापरली जात होती. मात्र, सन २००२ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने स्थानिक नागरिकांना पूर्वकल्पना न देता ही स्मशानभूमी हटविल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर चिंचवड गावासह परिसरातील नागरिकांना पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या घटनेला तब्बल २४ वर्षे उलटली असतानाही पारंपरिक अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा पूर्णपणे उपलब्ध झालेल्या नाहीत. कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना काळेवाडी, रावेत किंवा निगडी येथील स्मशानभूमींमध्ये जावे लागत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे गावातच पारंपरिक अंत्यसंस्काराची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने होत आहे.
चिंचवडकरांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर चिंचवड-काळेवाडी पुलाजवळ चिंचवडच्या हद्दीत सुमारे दोन वर्षांपूर्वी विद्युत दाहिनी सुरू करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र, विद्युत दाहिनी आणि लाकूड व गोवऱ्यांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची सुविधा या स्वतंत्र गरजा आहेत. विद्युत दाहिनी सुरू झाल्याने पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची आवश्यकता संपत नाही, अशी भूमिका शेखर चिंचवडे यांनी मांडली आहे.
हिंदू धर्मातील अनेक कुटुंबांसाठी पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याला धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व आहे. त्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना, परंपरा आणि स्थानिक गरजांचा विचार करून स्मशानभूमीत आवश्यक व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चिंचवड-काळेवाडी पुलाजवळील स्मशानभूमीत जागेची पाहणी करण्यात आली असून, तेथे दोन लोखंडी रॅक बसवून पारंपरिक अंत्यसंस्कारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या मागणीसंदर्भात आमदार शंकरभाऊ जगताप आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
चिंचवडकरांचा हा प्रश्न केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सामाजिक आणि भावनिक विषय म्हणून विचारात घ्यावा. महापालिका प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करून पारंपरिक अंत्यसंस्काराची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा शेखर बबनराव चिंचवडे यांनी व्यक्त केली आहे.
आता २४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर महापालिका प्रशासन कोणता निर्णय घेते आणि चिंचवडकरांना पारंपरिक अंत्यसंस्काराची सुविधा कधी उपलब्ध होते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.




Total Users : 233565