शबनम न्यूज | प्रतिनिधी
नागपूर विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रवी नगर येथील दादाजी धुनिवाले उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी राज्यातील निवडणूक होत असलेल्या सर्व पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले.
लोकशाही प्रक्रियेत मतदानाला विशेष महत्त्व आहे. निवडणुकीत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने सर्व पात्र मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. विभागातील एकूण ४४५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, २ लाख ५५ हजार ६०३ नोंदणीकृत पदवीधर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत. यामध्ये १ लाख ४७ हजार २८० पुरुष, १ लाख ८ हजार ३०१ महिला आणि इतर प्रवर्गातील २२ मतदारांचा समावेश आहे. मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीनंतर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल.




Total Users : 233196