शबनम न्यूज | प्रतिनिधी
वाकड येथील प्रभाग क्रमांक २६ मधील छत्रपती चौक ते मानकर चौक या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामाला गती देण्यासाठी आणि परिसरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी मानकर चौकाकडून छत्रपती चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यानुसार, १३ ऑक्टोबर २०२६ पासून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
छत्रपती चौकाकडून मानकर चौकाजवळील सोनिगरा सोसायटीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, सोनिगरा सोसायटी ते मानकर चौक या दरम्यानचे काँक्रीटीकरणाचे काम अद्याप बाकी आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या कामादरम्यान वाहनांची सततची ये-जा होत असल्याने कामात अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, काँक्रीटीकरणाच्या कामाला विलंब होत असून परिसरात वाहतूककोंडीची समस्याही निर्माण होत आहे.
रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे आणि नागरिकांना भविष्यात दर्जेदार रस्त्याची सुविधा मिळावी, यासाठी संबंधित भागातील वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड यांच्याकडील अधिसूचना क्रमांक पोउआ/वाहतूक/नियोजन/५६३८९८५/२०२६, दिनांक २ ऑक्टोबर २०२६ नुसार हे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.
असे असतील पर्यायी मार्ग
१. कस्पटे कॉर्नर चौकातून मार्ग : मानकर चौकाकडून छत्रपती चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कस्पटे कॉर्नर चौकातून पुढे जाऊन आपल्या इच्छित स्थळी पोहोचावे.
२. यू-टर्न घेऊन कस्पटे चौकातून मार्ग : मानकर चौकाकडून छत्रपती चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी मानकर चौकातून यू-टर्न घेऊन कस्पटे चौक मार्गे पुढील प्रवास करावा.
वाहनचालकांना सहकार्याचे आवाहन
रस्त्याचे काँक्रीटीकरण वेळेत पूर्ण करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी संबंधित ठिकाणी वाहतूक नियमांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांनी नियोजित मार्गाचा अवलंब करून संभाव्य वाहतूककोंडी टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.




Total Users : 232985