spot_img
spot_img
spot_img

पुणे नवरात्रौ महोत्सवात ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे आणि यशवंत देव यांना जन्मशताब्दी मानवंदना

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मराठी भावसंगीताचे विश्व आपल्या अजरामर संगीतरचनांनी समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे आणि संगीतकार, गीतकार यशवंत देव यांना, त्यांच्याच संगीतरचनांचे अर्घ्य अर्पण करणारी जन्मशताब्दी ‘स्वरवंदना’ ही आगळीवेगळी मैफल बुधवारी रसिकांना स्मरणरम्य काळात नेणारी ठरली.

३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या चौथ्या माळेची सायंकाळ मराठी भावसंगीतातील दिग्गज संगीतकार श्रीनिवास खळे आणि यशवंत देव यांच्या गाजलेल्या गीतांमुळे श्रवणीय ठरली. नेहरू स्टेडियम येथील गणेश कला क्रीडा मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात बालगीते, भावगीते, भक्तीगीतांपासून लावणीपर्यंतचे वैविध्य रसिकांनी अनुभवले.

कला, संस्कृती आणि संगीताचा संगम साधणाऱ्या पुणे नवरात्रौ महोत्सवात आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांच्या पुढाकाराने ‘जन्मशताब्दी स्वरवंदना’ हा कार्यक्रम रत्ना दहिवेलकर यांनी प्रस्तुत केला. या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता, निर्मिती, निवेदन आणि बालगीताचे गायन अशा अनेक भूमिका रत्ना दहिवेलकर यांनी पार पाडल्या.

जय जय महाराष्ट्र माझा, या श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या राजा बढे यांच्या गीताने खळे यांना कृतज्ञ स्वरांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर आदीशक्तीच्या उत्सवाचे औचित्य साधून माझी रेणुकामाऊली हे भक्तीगीत सादर झाले. पाठोपाठ तुझे गीत गाण्यासाठी, जीवनात ही घडी, लाजून हासणे, त्याची धून झंकारली, या जन्मावर या जगण्यावर, विसरशील खास मला, पहिलीच भेट झाली. स्वर आले दुरूनी, दिवस तुझे हे फुलायचे, शुक्रतारा मंदवारा, जेव्हा तुझ्या बटांना, कळीदार कपूरी पान, आनंदाचे डोही आनंद तरंग….अशा अजरामर संगीतरचनांचा आस्वाद रसिकांनी घेतला आणि जणु सांगीतिक अमृतयोग अनुभवला.

खळे आणि देव यांनी संगीतबद्ध केलेल्या बालगीतांचा मेडले रसिकांची दाद मिळवणारा ठरला. तसेच त्यांनी संगीतबद्ध केलेल्या भक्तीरचनांची मालिकाही रसिकांना भक्तीरसपूर्ण वातावरणात घेऊन गेली. खळे यांच्या रचना सुरांनी शब्दांना खुलवणाऱ्या तर देव यांच्या रचना शब्द, त्यातील आशय यांना जपत स्वरांचे कोंदण घेऊन येणाऱ्या होत्या. मराठी भावसंगीताचे आणि मराठी मनांचे संवेदनशील विश्व स्वरश्रीमंत करणारी ही मानवंदना ठरली.

याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष आबा बागुल, जयश्री बागुल, अमित बागुल यांच्यासह संगीता तिवारी, प्रसाद पिंपळखरे, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, घनश्याम सावंत, विलास रत्नपारखी, रमेश भंडारी आदी उपस्थित होते. आबा बागुल, जयश्री बागुल यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात धनंजय पवार, वैजू चांडवले, सावनी सावरकर, मधुर घैसास-बेहेरे, मयूर पांडे, डॉ. चेतन होशिंग या गायकांनी मैफिल सजवली तर यश भंडारे, शैलेश देशपांडे, बापू चौधरी, अक्षय शेवडे, हेमंत पोटफोडे आणि मल्हार भोरे यांनी त्यांना वाद्यसंग्त दिली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!