शबनम न्यूज | प्रतिनिधी
भोसरी येथील क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या , पुणे चॅप्टरच्या वतीने ४१ वे गुणवत्ता संकल्पनावरील विभागीय वार्षिक अधिवेशन २०२६ चे भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले .
यंदाच्या अधिवेशनात महाराष्ट्रातील १०० हून अधिक नामांकित औद्योगिक संस्थांनी सहभाग घेतला. दोन दिवस चाललेल्या या गुणवत्ता महोत्सवात एकूण ३०० हून अधिक केस स्टडीज, ५७ घोषवाक्य आणि ६३ पोस्टर स्पर्धकांनी सादर करण्यात आले. विजेत्याना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण, रजत व कास्य पदक , प्रशस्तीपत्रक देवुन त्याना सन्मानपुर्वक गौरविण्यात आले . या स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी ३८ परीक्षक लाभले होते, तर एकूण १३०० हून अधिक स्पर्धक, व्यवस्थापक आणि गुणवत्ता प्रेमींनी या अधिवेशनात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन दाना आनंद इंडिया प्रा. लि. चे बिझनेस युनिट हेड बालाजी माळी याच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे आयकॉन हॉस्पीटलचे संचालक, अध्यक्ष डॉ. प्रताप पोपट सोमवंशी , पिंपरी चिंचवड होमिओपथीक असोसिएशनचे माजी शहराध्यक्ष डॉ. संदीप लुणावत , क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, पुणे चॅप्टरच्या माजी अध्यक्षा व संचालिका डॉ .रजनी इंदुलकर , फोरमचे पदाधिकारी प्रकाश यार्दी, धनंजय वाघोलीकर , अनंत क्षीरसागर , माधव बोरवणकर , परवीन तरफदार , खजीनदार संजीव शिंदे , व्यवस्थापक चंद्रशेखर रुमाले उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्वालिटी सर्कल चळवळीचे महत्त्व अधोरेखित करताना, उत्पादन क्षेत्रापासून सेवा क्षेत्रापर्यंत गुणवत्ता, उत्पादकता आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी क्वालिटी सर्कल हे एक प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.
दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात विविध संस्थांतील कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील समस्या, त्यावरील उपाययोजना आणि त्यातून मिळालेले फायदे यांचे प्रभावी सादरीकरण केले. गुणवत्ता व्यवस्थापन, खर्चात बचत, सुरक्षितता आणि कार्यपद्धतीत सुधारणा या विषयांवरील केस स्टडीज विशेष आकर्षण ठरल्या.
या अधिवेशनामुळे उद्योगांमधील सर्वोत्तम पद्धतींची देवाण-घेवाण होण्यास मदत झाली असून, कर्मचाऱ्यांमध्ये टीमवर्क आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होण्यास प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाची प्रस्तावना माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे यांनी केली .सुत्रसंचालन विजया रुमाले व खजीनदार संजीव शिंदे यांनी तर आभार फोरमच्या संचालिका डॉ. रजनी इंदुलकर यांनी मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे चॅप्टरचे व्यवस्थापक चंद्रशेखर रुमाले , प्रशांत बोराटे , राहिममिर्झा बेग या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.




Total Users : 231018