spot_img
spot_img
spot_img

चिखलीतील स्मशानभूमीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; वाहनांच्या हेडलाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार!

नगरसेविका संगीता उर्फ नानी प्रभाकर ताम्हाणे आक्रमक; महापालिका प्रशासनाला तातडीने सुविधा पुरविण्याच्या सूचना

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील स्मशानभूमींची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना मृत्यूनंतरही हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तळवडे-चिखली परिसरातील स्मशानभूमीत नुकताच विद्युत पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने चक्क चारचाकी वाहनांच्या हेडलाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आली. या प्रकारामुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

स्मशानभूमीसारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना पुरेशा प्रकाशाअभावी अडचणींचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, महापालिकेने नियुक्त केलेला सुरक्षारक्षकही यावेळी जागेवर उपस्थित नसल्याचे समोर आले. त्यामुळे स्मशानभूमीतील व्यवस्थापन आणि सुरक्षा यंत्रणेचा कारभार नेमका कोणाच्या भरवशावर सुरू आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

या गंभीर प्रकारावर स्थानिक नगरसेविका संगीता उर्फ (नानी) प्रभाकर ताम्हाणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना अशा प्रकारे त्रास सहन करावा लागत असेल, तर या ढिसाळ कारभारावर नेमकी काय कारवाई करायची, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

स्मशानभूमीत आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, विद्युत पुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, तसेच नियुक्त सुरक्षारक्षक नियमितपणे उपस्थित राहील याची खात्री करावी, अशा सूचना नगरसेविका ताम्हाणे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

नागरिकांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगीही प्रशासनाकडून मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर महापालिकेच्या कारभाराचे करायचे काय? असा सवाल आता उपस्थित होत असून, या गंभीर प्रकाराची दखल घेऊन प्रशासन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का आणि स्मशानभूमीतील सुविधा तातडीने सुधारणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!