शबनम न्यूज | प्रतिनिधी
किवळे परिसरात वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस हवालदाराला भरधाव ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात हवालदार रस्त्यावर पडून त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी विजय भीमराव जगताप (वय ५०, पोलीस शिपाई) हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या देहूरोड वाहतूक विभागात नियुक्त आहेत. ते किवळे परिसरात राहतात.
८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.१० वाजण्याच्या सुमारास किवळे येथील कृष्णा चौक, बापदेव महाराज उड्डाणपुलाखाली, मावळा पुतळा परिसरात ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादी वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत असताना टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक MH12VF1553, मॉडेल क्रमांक १५१२, याचा चालक भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याचा आरोप आहे. चालकाने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदाराला मागून धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डाव्या पायाच्या टाचेच्या तसेच घोट्याच्या भागाला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
ट्रकचालक लक्ष्मण शिवाजी ताकभाते (वय ४२, व्यवसाय चालक) याचे नाव आरोपी म्हणून प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. तो सध्या कात्रज परिसरात भाड्याने राहत असल्याचे, तसेच त्याचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असल्याचे त्यात म्हटले आहे.




Total Users : 229994