शबनम न्यूज | प्रतिनिधी
बनावट शैक्षणिक व रहिवासी कागदपत्रांचा वापर करून सरकारी योजनेतील सदनिका स्वतःच्या नावावर केल्याचा गंभीर प्रकार भोसरी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन पुरुष आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी अशोक शिवाजी भोगल (वय ३७) हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दहशतवादविरोधी शाखेत नियुक्त असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मे २०२१ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत भोसरी येथील सेक्टर क्रमांक १२ मधील व्याघ्रगड सहकारी गृहनिर्माण संस्थेशी संबंधित सदनिका मिळवण्याच्या प्रक्रियेत कथित गैरप्रकार झाला. पहिल्या क्रमांकाच्या आरोपीचा जन्म उत्तर प्रदेशात झाला असताना त्याने पुण्यातील खडकी येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतल्याचा बनावट दाखला तयार केल्याचा आरोप आहे. तसेच, आरोपीच्या वडिलांच्या नावाने धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील नगर परिषद शाळेचा बनावट शाळा सोडल्याचा दाखला तयार करून घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे हवेली तहसील कार्यालयातून २०२१ मध्ये महाराष्ट्रातील रहिवासी दाखला मिळवण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्राबाहेरील रहिवासी असलेल्या आरोपी आणि त्याच्या पत्नीने या दाखल्यांचा वापर करून आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या सरकारी योजनेतील भोसरी सेक्टर १२ मधील इमारत क्रमांक बी/२० येथील सदनिका क्रमांक ९०४ स्वतःच्या नावावर केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात आरोपी क्रमांक १ मोहम्मद दानिश अब्दुल माजिद शेख (वय ४५, व्यवसाय ट्रान्सपोर्ट), आरोपी क्रमांक २ ही ३९ वर्षीय महिला आणि आरोपी क्रमांक ३ इरफान शेख, रा. खराळवाडी, पुणे, एजंट म्हणून नमूद आहेत. प्रसिद्धीपत्रकानुसार, आरोपी क्रमांक १ याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९७/२०२६ नुसार भारतीय दंड संहितेतील कलम ४६७, ४६८, ४७१, ४२० आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




Total Users : 229994