शबनम न्यूज | प्रतिनिधी
मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा विद्यार्थ्यांसह नागरिकांपर्यंत पोहोचावा तसेच मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित समूह नृत्य स्पर्धेत बालकलाकारांनी विविध नृत्याविष्कारांतून महाराष्ट्राची संस्कृती, लोककला आणि लोकपरंपरांचे सुंदर दर्शन घडविले.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे.
आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या छोट्या सभागृहात झालेल्या या समूह नृत्य स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘गोंधळ-कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’, ‘आले मराठे’, ‘आई गं तुझ्या चरणी’, ‘जिजाऊंच्या लेकी’, ‘शाळा मराठी’, ‘गौरव शब्दकलेचा, गौरव लोककलेचा’ अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. पारंपरिक वेशभूषा, संगीत, नृत्य आणि लोककलेचा सुरेख मेळ साधत बालकलाकारांनी मराठी संस्कृतीचे विविध पैलू प्रभावीपणे सादर केले.
बालकलाकारांच्या उत्स्फूर्त आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे सभागृहातील वातावरण उत्साहाने भारून गेले. प्रत्येक नृत्याविष्कारातून महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकपरंपरा, कला आणि सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडत होते. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत त्यांचा उत्साह वाढविला.
या स्पर्धेत महापालिका शाळा क्रमांक ९०३, पुनावळे, इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा, भोसरी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्राथमिक शाळा, संत तुकारामनगर, महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा, भोसरी, यशवंतराव चव्हाण कन्या प्राथमिक शाळा, थेरगाव, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा, थेरगाव, पुनावळे प्राथमिक शाळा, मोरवाडी यांसह महापालिकेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
मराठी भाषेचा केवळ अभ्यास न करता तिच्याशी जोडलेले साहित्य, कला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. समूह नृत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासोबतच व्यासपीठावर आत्मविश्वासाने सादरीकरण करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या नृत्यकौशल्याला, उत्साहाला आणि सादरीकरणातील ऊर्जेला उपस्थितांनी मनापासून दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.




Total Users : 229453