spot_img
spot_img
spot_img

“हो, मी असाच आहे नागडा…”; नानांचे बेधडक वक्तव्य ऐकून आम्ही झालो होतो अवाक!

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी सांगितली नाना पाटेकर यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण

नाना पाटेकर यांचा कसदार अभिनय, बेधडकपणा, स्पष्टवक्तेपणा आणि भूमिका मग ती गंभीर असो खलनायकाची असो की विनोदी असो प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याची त्यांच्यातील कलावंताची धडपड , नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी त्यांनी उभे केलेले कार्य यामुळे नानांना जवळून भेटण्याची खूप इच्छा होती. या भेटीत नानांशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या. मात्र बरमोडा घातलेले नाना शेवटपर्यंत तसेच बोलत राहिले. नानांना भेट म्हणून देण्यासाठी नेलेली बैलगाडी आणि ज्ञानेश्वरी त्यांनी त्याच बर्मोडावर स्वीकारली . वर अजून ‘तुम्ही अस्वस्थ का? मी असाच आहे नागडा ‘असे बेधडक विधान करून त्यांनी आम्हाला अवाकच केले. अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी सांगितली.

ज्येष्ठ दिवंगत अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्यानंतर आपण सर्वात अधिक प्रेम कोणावर केले असेल तर ते नाना पाटेकर यांच्या अभिनयावर असे सांगून सातुर्डेकर म्हणाले की, नानांचा कसदार अभिनय, त्याबरोबरच त्यांच्या अंगी असलेला बेधडकपणा यामुळे त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती. चार-पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते संदेशकुमार नवले, आबा खराडे आणि मी नानांना भेटायचे ठरवले. माहिती काढली. नाना त्यांच्या शेतावर असल्याचे कळले. नानांचा फटकळ स्वभाव पाहता नाना पटकन काही बोलून आपला अपमान तर करणार नाहीत ना असा प्रश्न पहिल्यांदा मला पडला. नंतर जाऊ दे अपमान झाला तरी ऐकायला कोण आहे तिघे मित्र आणि नाना असा विचार करून तिघेही रिक्षाने नानांच्या भेटीला गेलो. नाना शेतात भटकंती करून निवासस्थानी परतले. ओळखपाळख झाली.गप्पा झाल्या. मी नुसता पत्रकारच नाही तर कार्यकर्ताही आहे ही माझ्या मित्रांनी माझी ओळख नानाला सांगितली. तेव्हा मला वाटलं नाना आता पटकन काहीतरी म्हणणार. पण नाना म्हणाले नंदू, तुझ्यातला कार्यकर्ता असाच जिवंत ठेव. तेव्हा मी सुटकेचा निश्वास सोडला.

मात्र नाना बरमोडावर असल्याने नानांना भेट देण्यासाठी नेलेली बैलगाडी आणि ज्ञानेश्वरी तशीच हातात ठेवून आम्ही होतो. नाना आता ड्रेस बदलून येतील मग येतील याची वाट पाहत होतो. चहा झाला. गप्पा झाल्या. मग नानाने स्वतःच विचारले ही बैलगाडी आणि ज्ञानेश्वरी मला द्यायला आणली आहे ना ? आम्ही म्हटलं हो. मग द्या ना. आता त्याच स्थितीत बैलगाडी कशी द्यायची? म्हणून आम्ही नानांच्या बरमोडाकडे एक दृष्टिक्षेप टाकला. नानांच्या चाणाक्ष नजरेने ही गोष्ट ओळखली. ते म्हणाले ‘मला बरमोडावर काही वाटत नाही. तुम्ही कशाला अस्वस्थ होता ? मी असाच आहे नागडा ‘असे म्हणत नानांनी बरमोडावरच ती भेटवस्तू स्वीकारली. वर पत्नीला बोलावून अगं यांना सांग मी कसा आहे? मी पहिल्यापासूनच असा नागडा आहे की नाही हे यांना सांग असा टोलाही आम्हाला लगावला.

नानांचा बेधडकपणा वेळोवेळी जाणवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्वी जोरजोरात ओरडून भाषण करत. त्यावेळी एका कार्यक्रमात ‘देवेंद्र एवढं ओरडून भाषण करण्याची गरज नाही’ या शब्दात त्यांनी फडणवीस यांना सल्ला दिला होता. पुढे फडणवीस यांनी हा सल्ला आचरणात आणला हे आपण सर्वजण पाहत आहोत असे सातुर्डेकर म्हणाले.

एका वृत्तपत्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी राजकीय मंडळींकडे निवडून आल्यावर कोट्यावधीची प्रॉपर्टी,गाडी,घोडे कुठून येतात हा केलेला सवाल सर्वसामान्य माणसाच्या मनातला सवाल होता. म्हणूनच नाना पाटेकर केवळ अभिनेता नव्हते. स्पष्ट वक्ते कार्यकर्ते होते. विविध विषयांवर त्यांनी भूमिका घेतली. ही भूमिका घेताना अनेकांना ती आवडली ही नाही पण नानांनी कधी त्याची पर्वा केली नाही त्यामुळेच नाना हे वेगळेच रसायन होते. अशा भावना सातुर्डेकर यांनी व्यक्त केल्या.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!