spot_img
spot_img
spot_img

युवाशक्तीला संधी देऊन सक्षम राष्ट्राची निर्मिती – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

‘रोजगार महाकुंभ’ मधून युवकांच्या स्वप्नांना मिळाले बळ- आमदार शंकर जगताप

 नवी सांगवी येथील रोजगार महाकुंभात ६४ कंपन्यांचा सहभाग
 ८१५७ युवक युवतींनी रोजगारासाठी नोंदणी; ३२०० जणांना मिळणार नोकरीची संधी

पिंपरी : तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देणे, त्यांना कौशल्य आणि नवोपक्रमाच्या बळावर पुढे जाण्यास प्रोत्साहित करणे आणि या युवाशक्तीच्या सहभागातून सक्षम, विकसित राष्ट्र घडवणे, हेच भाजपचे ध्येय आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी केले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवी येथे आयोजित ‘रोजगार महाकुंभ – २०२६’ मध्ये ते बोलत होते. आजच्या महाकुंभमध्ये ८ हजार १५७ युवक युवतींनी रोजगारासाठी नोंदणी केली. विविध कंपन्यांमध्ये या युवकांच्या मुलाखती पार पडल्या. यामध्ये ३ हजार २०० हून युवक युवतींना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे.
काही निवड झालेल्या उमेदवारांना चव्हाण यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तिपत्रे देण्यात आली.

नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित ‘रोजगार महाकुंभ’च्या निमित्ताने यावेळी महापौर रवि लांडगे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, माजी आमदार अश्विनी जगताप,
भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, भाजपा सरचिटणीस मधुकर बच्चे, प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या रूपाली देवकर, विद्या गोते यांच्यासह प्रतिष्ठानच्या सदस्या उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, २०१४ नंतर देशाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि व्यवस्थेतील भ्रष्टाचार व अडथळे दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. देशाला विकसित भारताच्या दिशेने न्यायचे असेल, तर प्रत्येक नागरिकाने राष्ट्रप्रथम ही भावना ठेवून आपले योगदान दिले पाहिजे. रोजगार मेळावे युवकांना संधी देतात; त्या संधींचे रूपांतर कौशल्य, कष्ट आणि नव्या कल्पनांच्या बळावर प्रगतीत करणे तरुणांच्या हाती आहे, असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, नवोपक्रमाबरोबरच अवकाश क्षेत्राशी संबंधित उद्योगांतही युवकांसाठी संधी निर्माण होऊ शकतात, याकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष दिले. यातून या क्षेत्रातही वेगळ्या संधी आज उपलब्ध होत आहे. पारदर्शक कार्यपद्धती आणि उद्योगांना पोषक वातावरण यामुळे गुंतवणुकीला चालना मिळते, असे सांगताना त्यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामकाजाचा उल्लेख केला. डेटा सेंटर आणि त्यांच्याशी निगडित पूरक उद्योगांमधील संधींचाही युवकांनी विचार करावा, असे ते म्हणाले. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून आपल्या ऊर्जेला रोजगार, नवोपक्रम आणि देशसेवेची दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात आमदार शंकर जगताप म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवाभावी उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर हा महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ नोकरी मेळावा नसून तरुणांची स्वप्ने व क्षमता उद्योगांच्या गरजांशी जोडणारे व्यासपीठ आहे. उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळत नाही आणि पात्र युवकांना योग्य नोकरी मिळत नाही, ही दरी कमी करण्यासाठी युवक, कंपन्या, औद्योगिक आस्थापना, प्रशिक्षण संस्था आणि शासन यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘डोअर स्टेप एम्प्लॉयमेंट’च्या संकल्पनेतून रोजगाराच्या संधी तरुणांजवळ नेल्या जात आहेत. या संदर्भात जगताप यांनी राज्यातील ५०० हून अधिक रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह, तसेच पुणे जिल्ह्यातील ३० शैक्षणिक संस्थांमधील मेळाव्यांचा उल्लेख केला. महिला, दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांना विशेष संधी मिळाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पहिल्या मुलाखतीत यश न आल्यास निराश न होता आपल्या कमतरता ओळखून कौशल्य वाढवावे; मोबाईलचा उपयोग शिक्षण, रोजगार शोध आणि उद्योगनिर्मितीसाठी करावा, असा सल्ला त्यांनी युवकांना दिला. सुरुवातीला मिळणारी संधी स्वीकारून अनुभवाच्या बळावर पुढे जाण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी मनोजकुमार मारकड, भारत मदने यांनी पुढाकार घेतला . सहभागी सर्व युवक-युवतींना आयोजकांच्या वतीने विशेष ‘सहभाग प्रमाणपत्र’ देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रशांत शितोळे यांनी मानले.

दिव्यांग बांधवांसाठी प्रवेशद्वारावरच मुलाखत!

रोजगार महाकुंभात दिव्यांग उमेदवारांसाठी देखील संधी उपलब्ध करून देण्यात आली होती . याच वेळी एका दिव्यांग उमेदवाराची मुलाखत घेण्यासाठी अधिकारी स्वतः कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारापर्यंत गेले. तेथेच मुलाखत घेऊन त्या उमेदवाराची निवड करण्यात आली आणि त्याला रोजगाराची संधी मिळाली. संधी उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रसंग मेळाव्यात विशेष ठरला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील या गोष्टीचे कौतुक केले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोजगाराभिमुख दृष्टिकोनाला बळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दिव्यांग बांधवांसह प्रत्येक पात्र तरुणापर्यंत रोजगाराची संधी पोहोचावी, यासाठी हा रोजगार महाकुंभ आयोजित केला . तरुणांच्या कौशल्याला योग्य संधी मिळाली, तर नक्कीच सक्षम राष्ट्रनिर्मितीचा पाया रचला जाईल.”

— शंकर जगताप
आमदार चिंचवड विधानसभा मतदारसंघ

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!