spot_img
spot_img
spot_img

विविध भारती संगीतमय स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत संगीतमय स्नेहमेळावा रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीकृष्ण पॅलेस, जुना मुंबई – पुणे महामार्ग, पिंपरी येथे अपूर्व उत्साहात संपन्न झाला. स्नेहमेळाव्यात नंदकुमार कांबळे यांच्या संकल्पनेतून आणि विनायक कदम यांच्या आयोजनातून ‘प्यार करनेवाले प्यार करते हैं शान से!’ ही जुन्या लोकप्रिय हिंदी – मराठी चित्रपटगीतांची सांगीतिक मैफल सादर करण्यात आली होती. याप्रसंगी राज्य नाट्य निर्माता व्यावसायिक संघाचे अध्यक्ष राहुल भंडारे, अभिनेत्री श्रद्धा हांडे, दिशा सोशल फाउंडेशनचे माजी कार्याध्यक्ष सचिन साठे, सचिन शेटे, साहित्यिक प्रदीप गांधलीकर, रजनी बराटे, मोहिनी जाधव, अलका ताम्हाणे, परवीन पठाण, करण सिंग आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मैफलीत अतिथी गायिका सौजन्या गिरी आणि ललिता जगदाळे, हर्षा वैद्य, पूनम झांबरे, जहांगीर पठाण, सूर्यकांत ताम्हाणे, डाॅ. कविता बोंडे, दिनेश कर्वे, सुभाष चव्हाण, स्मिता गायकवाड, शैलेंद्र पाटील, डाॅ. सुमेध अंदूरकर, स्वाती भागवत, शिरीष हांडे, स्वाती पाटील, अरुण सरमाने, विजय कांबळे, उत्तम जाधव, अश्विनी जवंजाळ, चंद्रकांत हिवरकर, सचिन जवंजाळ, नंदकुमार कांबळे आणि विनायक कदम या गायक कलाकारांनी वैविध्यपूर्ण प्रेमगीतांचे एकल आणि युगुलस्वरातील सुरेल गायन करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. शंखवादनाच्या मंगलमय सुरांनी मैफलीचा प्रारंभ करण्यात आला. शास्त्रीय संगीतावर आधारित हिंदी गीतांबरोबरच पाॅप, जाॅझ, डिस्कोच्या सुरावटीतील उडत्या चालीतील गीतांना मराठमोळ्या श्रवणीय गाण्यांची साथ लाभल्याने रसिक श्रोत्यांना परिपूर्ण संगीत मैफलीचा स्वरानंद लाभला. यामुळे प्रभावित झालेल्या अभिनेत्री श्रद्धा हांडे यांनी, ‘कोणतीही कला अथवा मंच हा छोटा किंवा मोठा नसतो; तर सादरीकरणातील आत्मीयता महत्त्वाची असते!’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली; तसेच नाट्य निर्माता राहुल भंडारे यांनी आयोजक आणि गायक कलाकारांविषयी कौतुकास्पद गौरवोद्गार काढले.

आकाश गाजूल यांनी छायाचित्रण केले. सौमिल घावटे यांनी दृकश्राव्यचित्रण केले. सचिन शेटे यांनी विशेष सहकार्य केले. सानिका कांबळे आणि अक्षदा यादव यांनी संयोजनात सहकार्य केले. निराली मांकड यांनी खुसखुशीत शैलीतून निवेदनासह बहारदार गीतांवर दिलखेचक नृत्याविष्कार केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!