spot_img
spot_img
spot_img

महानगरपालिकेच्या वतीने थेरगाव येथे सफाई मित्र सुरक्षा शिबिर संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्याची नियमित तपासणी तसेच सुरक्षित कामकाजाबाबत जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिरा’चे आयोजन करण्यात आले.

थेरगाव येथील कै. शंकरराव गावडे कामगार भवन येथे झालेल्या या शिबिरात ‘अ’, ‘ब’, ‘ड’ ‘ग’ आणि ‘ज’ या पाच क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कार्यरत १,५०० हून अधिक सफाई सेवकांनी सहभाग घेतला होता,या शिबिराचे उद्घाटन ग क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप यांनी केले.
यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, सुधीर वाघमारे, अंकुश झिटे, अतुल सोनवणे, राजू साबळे, शांताराम माने, डॉ. संजय सोनेकर, डॉ. शंकर मोसलगी, आदी उपस्थित होते.
शिबिरात सफाई सेवकांची हिमोग्लोबिन, रक्तदाब, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची मोफत तपासणी करण्यात आली. दैनंदिन कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी संतुलित आहार, व्यायाम, योगासने, प्राणायाम, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कामाच्या स्वरूपानुसार सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि आरोग्यविषयक सवयींबाबतही माहिती देण्यात आली.
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, सफाई सेवकांचे काम शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याने संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगासने आणि आरोग्य तपासणी आवश्यक आहे. आरोग्यविषयक समस्या वेळीच लक्षात आल्यास त्यावर योग्य उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय करता येतात.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, नियमित आरोग्य तपासणीमुळे प्राथमिक अवस्थेतील आरोग्यविषयक समस्या वेळीच निदर्शनास येतात. त्यामुळे सफाई सेवकांनी आरोग्य तपासणीसोबतच आहार आणि ताणतणावाच्या व्यवस्थापनाकडेही लक्ष द्यावे.

कौशल्यविकासाच्या संधींची माहिती

सफाई सेवकांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील युवक-युवतींना कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने समाजविकास विभागाच्या वतीने ‘लाईट हाऊस कौशल्य’च्या माध्यमातून माहिती केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्राद्वारे १८ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींसाठी उपलब्ध असलेल्या विविध मोफत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांची माहिती वैशाली खरात यांनी दिली.
यामध्ये लेखा सहाय्यक, विद्युत उपकरण दुरुस्ती, विक्री प्रतिनिधी, विद्युत वाहन तंत्रज्ञ, बँकिंग व वित्तीय सेवा, सामान्य परिचर, परिचर्या सेवा, संगणक नियंत्रित यंत्रचालक, बँक ग्राहक संबंध अधिकारी, माहिती विश्लेषक, चित्ररचना, उपाहारगृह व्यवस्थापन, वाहतूक व साठवणूक व्यवस्थापन, विद्युत मंडल जोडणी उपकरण हाताळणी, संगणकीय विपणन, वैयक्तिक प्रशिक्षण, क्रीडा पोषण, बालसंगोपन व शिक्षण, वातानुकूलन व शीतकरण यंत्र दुरुस्ती, किरकोळ विक्री केंद्र व्यवस्थापन, दुचाकी दुरुस्ती, हॉटेल व्यवस्थापन आणि भ्रमणध्वनी दुरुस्ती आदी कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली.
कौशल्याधारित प्रशिक्षणातून उपलब्ध रोजगाराच्या संधी, विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे स्वरूप आणि प्रशिक्षणानंतरच्या रोजगाराच्या पर्यायांची माहिती युवक-युवतींना देण्यात आली. त्यामुळे सफाई सेवकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातील युवक-युवतींसाठी कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
प्रास्ताविक सहाय्यक आरोग्याधिकारी अतुल सोनवणे यांनी सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर सुधीर वाघमारे यांनी उपस्थितांचे यावेळी आभार मानले.

३० सप्टेंबरला पुढील शिबिर

‘स्वच्छतेत सहभाग- स्वच्छ भारत, विकसित भारत’ या मध्यवर्ती संकल्पनेनुसार राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’त सफाई मित्रांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत आहे. या अभियानाचा पुढील टप्पा म्हणून बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी ‘क’, ‘इ’, ‘फ’, ‘ह’ आणि ‘ल’ या उर्वरित पाच क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कार्यरत सफाई सेवकांसाठी सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

सफाई सेवक शहर स्वच्छ ठेवण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी आणि सुरक्षिततेची काळजी घेणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. सफाई सेवकांचे आरोग्य जपणे म्हणजे शहराच्या आरोग्याची काळजी घेणे होय.

–  डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

आरोग्याबरोबरच, बदलत्या रोजगाराच्या गरजांनुसार युवक-युवतींना आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. कौशल्यविकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होते. सफाई सेवकांच्या कुटुंबातील युवक-युवतींना त्यांच्या आवडी आणि क्षमतेनुसार कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

  • कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!