spot_img
spot_img
spot_img

‘समाध्यात्म’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 ‘अध्यात्म ही आनंदवृत्ती आहे!’ असे विचार आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त श्री योगी निरंजनाथ गुरू शांतीनाथ यांनी अरविंद – वृंदा सभागृह, स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव लिखित ‘समाध्यात्म’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना योगी निरंजनाथ बोलत होते. जगद्गुरू तुकाराममहाराज यांचे वंशज ह. भ. प. अनिकेतमहाराज मोरे अध्यक्षस्थानी होते; तसेच स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, सचिव मिलिंद कुलकर्णी, राज अहेरराव यांची व्यासपीठावर; तर पिंपरी – चिंचवडमधील साहित्यिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर यांची सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

योगी निरंजनाथ पुढे म्हणाले की, ‘संपूर्ण विश्वाचे कल्याण चिंतणाऱ्या सनातन धर्मात भगवान शंकर शब्दांचा आद्यनिर्माता असून भगवान श्रीकृष्णाने गीता कथन करून
कवींची परंपरा निर्माण केली. ज्ञानोबा – तुकोबांसह सर्व संत मांदियाळीने ही परंपरा समृद्ध केली आहे. त्याच परंपरेतून ‘समाध्यात्म’ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून कवीने समाजाशी अविरत संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. संन्यस्तवृत्तीने समाजासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे, ही आनंदाची बाब आहे!’ राज अहेरराव यांनी आपल्या मनोगतातून, ‘आजपर्यंत विविध विषयांवर लेखन केले. सुमारे दहा वर्षांपासून भगवद्गीतेने झपाटून टाकले. विविध धर्मग्रंथांचे वाचन केल्यानंतर त्यांचा सारांश म्हणजेच भगवद्गीता आहे, हे सत्य उमगले. प्रपंचात राहूनही अध्यात्मात रमता येते ही अनुभूती घेताना स्वतःच्या मूळ स्वरूपाचा शोध घेणे तसेच समाज आणि संस्कृती यांचा समन्वय साधणे म्हणजेच अध्यात्म होय, ही प्रचिती आली!’ अशा भावना व्यक्त करून दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल साहित्यिकांचे कसदार लेखन प्रकाशित केले जाईल!’ अशी ग्वाहीदेखील अहेरराव यांनी दिली. अनिकेतमहाराज मोरे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘सुमारे शंभर वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वारकरी संप्रदाय हा अनुबंध अधिकाधिक दृढ होत आहे. संतविचारांची परंपरा जोपासणारा ‘समाध्यात्म’ हा काव्यसंग्रह कमी शब्दांतून मोठा आशय व्यक्त करतो!’ असे मत मांडले.

दीपप्रज्वलन, सरस्वती आणि अखंड भारतमाता यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. मिलिंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून सेवा, वाड्.मय, समाजप्रबोधन आणि महिला विभाग या चार आयामातून स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था कार्यरत आहे, अशी माहिती दिली. दत्तोपंत म्हसकर संस्था आणि नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. चैतन्य पंडित यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डाॅ. भाग्यश्री जोशी यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!