शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या माजी विद्यार्थी आणि सध्याच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यरचनांची सायंकाळ ‘आविष्कार भारती’ हा कार्यक्रम ३८ व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत सादर करण्यात आला. या कार्यक्रमाने मंत्रमुग्ध केले.
या सायंकाळची सुरुवात पुण्याच्या ज्ञान आणि संस्कृतीचा गौरव करणाऱ्या ‘शिक्षा और संस्कृति की धरोहर – पुणे’ या विशेष सादरीकरणाने झाली. या नृत्यरचनेने विभागीय युवा महोत्सवात प्रथम पारितोषिक पटकावले होते.
या सायंकाळी कथक, भरतनाट्यम, सत्रिय आणि मोहिनीअट्टम या नृत्यप्रकारांचे उत्कृष्ट सादरीकरण झाले. यामध्ये सायली काणे यांची दशमहाविद्या, श्रुती कुलकर्णी यांची सोल इन एक्झाइल, सिद्धी अभय यांची शिखंडी, जयश्री आणि मधुरा इनामदार यांची तृष्णा आणि आदी स्कूल ऑफ डान्सची आंध मुनि यांसारख्या विषयप्रधान नृत्यरचनांचा समावेश होता. या सर्व संकल्पना अतिशय प्रभावी होत्या आणि प्रत्येक रसिकांच्या मनाला भिडल्या.
पूर्वा शहा यांची होरी, तसेच भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कथक तराणा आणि कालिंगा नर्तन तिल्लान यांसारख्या पारंपारिक रचनांनी कार्यक्रमात शास्त्रीय सौंदर्याची भर घातली आणि प्रेक्षकांवर अविस्मरणीय छाप पाडली.
संपूर्ण नृत्य-संध्येचे समन्वयन नृत्य विभाग प्रमुख डॉ. देविका बोरठाकुर आणि स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या प्रसंगी पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रा. शारंगधर साठे, देविका बोरठाकुर आणि श्रीमती मनीषा अभय, श्रीमती अरुंधती पटवर्धन, श्रीमती लीना केतकर, श्रीमती आभा औटी आणि श्रीमती स्वरदा कुलकर्णी यांसारख्या नामवंत नृत्यांगना आणि गुरू उपस्थित होते.




Total Users : 226119