spot_img
spot_img
spot_img

चित्रकला ही अभिनयापेक्षा कठीण कला – ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचे प्रतिपादन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कोर्या कॅनव्हासवर व्यक्त होणे, ही अवघड कला असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी येथे व्यक्त केले. मी अभिनेता आहे. मला अभिनयाची कला येते. मात्र, चित्रकला ही त्याहून कठीण कला आहे, असे ते म्हणाले.

पुणे फेस्टिव्हल अंतर्गत ॲड. अनुराधा भारती प्रस्तुत आकृती ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन मोहन जोशी यांच्या हस्ते बुधवारी झाले. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डाॅ. सतीश देसाई, ज्येष्ठ चित्रकार चिंतामणी हसबनीस, ॲड.अनुराधा भारती हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व चित्रकारांचा प्रशस्तीपत्र देऊन यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुणे फेस्टिव्हलमध्ये आकृती ग्रुपचे हे सलग १९ वे चित्रप्रदर्शन असून, बुजुर्ग चित्रकार पद्मविभूषण सतीश गुजराल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या अमूर्त चित्रशैलीचा सन्मान म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळात सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

ॲड. अनुराधा भारती प्रदर्शनाविषयी म्हणाल्या, ‘या प्रदर्शनात सुमारे ८० चित्रकारांच्या चित्रकृतींचा समावेश आहे. प्रामुख्याने अमूर्त चित्रशैलीला प्राधान्य देण्यात आले आहे. शंभरपेक्षा अधिक चित्रे प्रदर्शनात रसिकांना बघता येतील. ज्येष्ठ चित्रकार सतीश गुजराल यांच्या विलक्षण कलाप्रवासाचे दर्शन या निमित्ताने घडावे, गुजराल यांचा सात दशकांचा चित्रवारसा, त्यांनी साकारलेली भव्य भित्तिचित्रे आणि त्यांची कालातीत कलादृष्टी यांना उजाळा मिळावा तसेच नव्या पिढीसमोर त्यांची चित्रशैली यावी, या उद्देशाने हे चित्रप्रदर्शन गुजराल यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे. चित्रकारांमध्ये एसएनडीटी काॅलेजच्या २० विद्यार्थिनी तसेच श्रीमती शकुंतला हेमराज मुथा चित्रकला महाविद्यालयाच्या २५ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, ‘गुजराल यांच्यासारख्या ज्येष्ठ चित्रकारांच्या स्मृतींचे जागरण या प्रदर्शनाच्या निमित्ताने होत आहे आणि युवा चित्रकारांचा सहभाग प्रदर्शनात आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.

हसबनीस यांनी मोहन जोशी यांच्यासोबतच्या भेटीला उजाळा दिला. ‘पुणे फेस्टिव्हलच्या वतीने चित्रकलेला प्रोत्साहन मिळत आहे, याचा आनंद वाटतो’, असे ते म्हणाले.

मोहन जोशी यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर प्रत्येक चित्रकाराशी त्याच्या चित्रापाशी जाऊन संवाद साधला. डाॅ. श्रुती दातार यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ. सतीश देसाई यांनी आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!