शबनम न्यूज | प्रतिनिधी
विदेशी कथाबीजाचे संगीत रंगभूमीवरील अस्सल देशीकार लेणे मानले जाणाऱ्या ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ या नाटकाचा विलक्षण रंगतदार प्रयोग रसिकांनी मंगळवारी येथे अनुभवला आणि प्रयोगासोबत वन्समोअरची दाद मिळवत मैनाराणीच्या सांगीतिक प्रगल्भतेच्या प्रवासात रसिकही सहभागी झाले.
पुणे फेस्टिव्हल अंतर्गत मंगळवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात विद्याधर गोखले लिखित संगीत स्वरसम्राज्ञी या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग झाला. नटनागर कल्चरल असोसिएशन, पुणेची ही निर्मिती होती. प्रारंभी नाटकातील सर्व कलाकार, साथसंगतकार, पडद्यामागील कलाकारांचे सत्कार पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. नाटकात प्रमुख भूमिका साकारणारे चारुदत्त आफळे, गौरी पाटील, तसेच अभय जबडे, सौरभ पांधरे, कौशिक कुलकर्णी, श्रद्धा सबनीस, चारुलता पाटणकर, राहुल गोळे (आर्गन), प्रथमेश देवधर (तबला) व लक्ष्मण पाटील (ट्रॅक्स) यांचा त्यात समावेश होता.
नाटकाच्या सुरवातीलाच रंगलेला गण, नमन, लावणी, बतावणीने प्रेक्षकांची पकड घेतली. टुमदार कुणाची छान, श्रीकृष्णा सारंगधरा..या रचना दमदारपणे सादर झाल्या. कशी केलीस माझी दैना, गुणसागर गंभीर, अहो इथे मांडिला, एकलीच दीपकळी मी अभागिनी, रे तुझ्यावाचून काही येथले अडणार नाही, बलमा आये रंगीले, राधिके तूने कैसे, आज गानशारदेस लाभली सुधन्यता, तुज वंदन गानशारदे, सप्तसूर सूरगंगा सुखद जलतरंगा…अशा नाट्यपदांचे आटोपशीर पण प्रभावी सादरीकरण वन्समोअरची दाद मिळवणारे ठरले. इरसाल खड्या आवाजाची लावणी गायिका मैना पं. गंगाधऱपंतांच्या तालमीतून तावून सुलाखून अभिजात रागसंगीताची स्वरसम्राज्ञी होते, हा तिचा प्रवास मांडणारे हे नाटक विद्याधर गोखले यांनी लिहिले आणि १९७२ मध्ये प्रथम रंगमंचावर आले. गेल्या ५० पेक्षा अधिक वर्षे या नाटकाची मोहिनी टिकून असल्याचा प्रत्यय या प्रयोगाने दिला. पं. नीलकंठ अभ्यंकर यांनी या नाटकातील पदांसाठी मालकंस, नटभैरव, खमाज, यमन, भूप, गावती, सोहनी, केदार अशा विविध रागांचे कोंदण देत ही पदे लोकप्रिय केली. चारुदत्त आफळे (पं. गंगाधरबुवा) आणि गौरी पाटील (मैनाराणी) यांनी प्रमुख भूमिकेत कसदार अभिनय आणि तयारीचे गायन, यातून बहार उडवून दिली. चंडोल तसेच तारिणीदेवी यांचेही प्रवेश विनोदाच्या शिडकाव्याने हास्याची कारंजी फुलवणारे ठरले.




Total Users : 225190