पुणे : वेतनवाढ आणि नोकरी कायम करण्याच्या मागण्यांसाठी हरियाणातील हिसार परिसरात सफाई कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ संप पुकारला आहे. या आंदोलनादरम्यान सफाई कर्मचाऱ्यांवर पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत पुणे शहर मेहतर वाल्मिकी महासंघाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन करत संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर बळाचा वापर करणे योग्य नसून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यासंदर्भातील निवेदन पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना महासंघाच्या शिष्टमंडळाने दिले. सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह नोकरी कायम करण्याच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही महासंघाच्या वतीने करण्यात आली.
या आंदोलनात पुणे शहर मेहतर वाल्मिकी महासंघाचे अध्यक्ष रवीभाई परदेशी, महासचिव नरेश इंद्रसिंग जाधव, किशोर वाघेला, किशोर भेंडवाल, अर्जुनभाई सोलंकी, महेंद्र लालबिगे, सुरेश देडुंडा, गोपाल वाघमारे, कधीर पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




Total Users : 223733