शबनम न्यूज | प्रतिनिधी
डंपरचा हॉर्न वाजवण्याच्या किरकोळ कारणावरून झालेला वाद थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना चाकणमधील नानेकरवाडी परिसरात घडली. स्क्रॅप गोडाऊनमधून डंपर घेऊन बाहेर पडणाऱ्या चालकाचा रस्ता अडवून दोघांनी शिवीगाळ केली. त्यानंतर डंपरमध्ये चढून लोखंडी टॉमीने चालकाच्या डोक्यात मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत मच्छिंद्र जाधव (वय २४, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हरिदास रामकिसन कलबोले आणि लक्ष्मण तातेराव आवले अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या नोंदीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास डंपर चालक महादेव शंकर सोळंके हे नानेकरवाडी येथील स्क्रॅप गोडाऊनमधून डंपर घेऊन बाहेर पडत होते. यावेळी डंपरचा हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांची गाडी अडवली.
यानंतर दोघांनी चालकास शिवीगाळ करत वाद घातला. आरोपी डंपरमध्ये चढले आणि लोखंडी टॉमी काढून ‘तुला आज जिवंत सोडत नाही’ अशी धमकी देत चालकाच्या डोक्यात आलटून-पालटून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या हल्ल्यात चालक महादेव सोळंके गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास *चाकण दक्षिण पोलीस* करत आहेत.




Total Users : 223443