spot_img
spot_img
spot_img

दापोडीतील शून्य कचरा प्रकल्पाला उपमहापौर शर्मिला बाबर यांची भेट

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि वैष्णवी महिला बचत गटाच्या माध्यमातून दापोडी येथे राबविण्यात येत असलेल्या शून्य कचरा प्रकल्पाला उपमहापौर शर्मिला बाबर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाची संपूर्ण कार्यपद्धती आणि कचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया जाणून घेतली. तसेच प्रकल्पात कार्यरत महिलांशी संवाद साधून त्यांच्या कामकाजाची माहिती घेत त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.
यावेळी सहाय्यक आरोग्य निरीक्षक राजेश भाट, अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य निरीक्षक ओंकार शिवरकर, प्रभारी आरोग्य निरीक्षक उमेश जाधव, समाज विकास विभागाच्या समूह संघटिका वैशाली लगडे, योजक संस्थेच्या सिनिअर मॅनेजर सेजल जोशी यांच्यासह प्रकल्पात कार्यरत महिला उपस्थित होत्या.

महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग, आरोग्य विभाग आणि पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वैष्णवी महिला बचत गटातील सात महिला या प्रकल्पाचे कामकाज सांभाळत आहेत. या माध्यमातून कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याबरोबरच महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

या प्रकल्पामध्ये संकलित केलेल्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाते. तसेच प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून बेंच, पेव्हिंग ब्लॉक यांसारख्या विविध उपयुक्त वस्तू तयार करण्यात येतात. त्यामुळे कचऱ्याचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीला चालना मिळत असून परिसरातील स्वच्छताही राखली जात आहे.

शून्य कचरा प्रकल्पामुळे परिसरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असून कचरा वाहतूक करून मोशी येथील कचरा डेपोवर टाकण्याचा भारही कमी होतो. स्थानिक पातळीवरच कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याने कचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक होण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर या उपक्रमातून बचत गटातील महिलांना नियमित रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळत असून त्यांच्या आर्थिक स्थितीतही सकारात्मक बदल होत आहे.
कचरा व्यवस्थापनासोबतच महिला सक्षमीकरणाचा प्रभावी नमुना म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू तयार करून त्यातून उत्पन्न मिळविणाऱ्या या महिला परिसरातील इतर नागरिक आणि महिला बचत गटांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिला आर्थिक सक्षमीकरण या तिन्ही बाबींचा समन्वय या प्रकल्पातून साधला जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!